नागपूर : मातृत्वाची अनुभूती म्हणजे सुखद अनुभव, पण मूल जन्माला येताच ते गमवावे लागले, तर ते दुःख न पचवता येणारे असते. ‘ली’ वाघिणीच्या बाबतीतही नेमके हेच घडले. एकदा, दोनदा नाही तर तिसऱ्यांदा तिला मातृत्वाची अनुभूती येऊनही प्रत्येकवेळी बछड्यांना गमवावे लागले. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘ली’ या वाघिणीचा मातृत्वाचा सोहळा रंगण्याआधीच त्या आनंदावर विरजण पडले.

‘ली’ ही वाघीण अवघी महिनाभराची असताना २००९ साली चंद्रपूर जिल्ह्यातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आली. तीन वर्षांपूर्वी ‘राजकुमार’ हा वाघ भंडारा जिल्ह्यातील एका लग्नसमारंभात पोहोचल्याने त्याची रवानगी थेट गोरेवाड्यात करण्यात आली. त्याला सोबत म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून ‘ली’ ला देखील गोरेवाड्यात आणले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात दोघांनाही सफारीसाठी एकत्रच सोडण्यात आले. त्यातून १३ वर्षाची ‘ली’ गर्भवती राहिली.

मंगळवारी (३१ मे) दुपारी ‘ली’ला प्रसूती वेदना सुरू झाल्या. चार वाजता तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर तिने बछड्याची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला व तो मृत पावला. ‘ली’ पुन्हा दुसऱ्या बछड्याला जन्म देईल म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाट पाहिली, पण बुधवारी सकाळपर्यंत तसे काही झाले नाही.

हेही वाचा : विश्लेषण : वाघांची वाढती संख्या – कारणे काय? समस्या काय?

यापूर्वी २०१८ साली ‘ली’ गोरेवाडा बचाव केंद्रात ‘साहेबराव’ या वाघापासून गर्भवती राहिली होती. त्यावेळी देखील तिने चारही बछडे गमावले. तर महाराजबाग प्राणिसंग्रहालयात देखील ‘साहेबराव’ या वाघापासून ती गर्भवती राहिली, पण तिथेही तिने बछडे गमावले. तीनदा मातृत्वाची अनुभूती येऊनही मातृत्वाचा सोहोळा तिला साजरा करता आला नाही.