२०१६ ते जानेवारी २०२१पर्यंत दहा जणांचा मृत्यू; मध्य रेल्वे विभागातील चित्र
नागपूर : रेल्वेगाडय़ा सुरक्षित धावाव्यात म्हणून रुळांची दुरुस्ती करीत असताना धावत्या रेल्वेगाडीखाली येऊन ट्रॅकमेंटेनर मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१६ ते जानेवारी २०२१पर्यंत मध्य रेल्वेत दहा जणांनी आपले प्राण गमावले, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे. दरम्यान, अतिरिक्त कामामुळे कर्मचारी तणावात वावरत असल्याने या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप ट्रॅकमेंटेनरच्या संघटनांनी केला आहे.
रेल्वेत रुळांची देखभाल दुरुस्ती ट्रॅकमेंटेनर करीत असतात. हे रेल्वे संचलनालयातील अत्यंत महत्त्वाचे आणि दैनंदिन काम आहे. त्यामुळे रेल्वेगाडय़ांचे सुरक्षित संचलन शक्य होते. ट्रॅकमेंटेनर हा रेल्वेतील सर्वात कनिष्ठ दर्जाचा कर्मचारी असतो. भारतात रेल्वेगाडय़ांची संख्या वाढत आहे. तसेच रेल्वे रुळ अद्ययावत झाल्याने रेल्वेगाडय़ांचा वेग देखील वाढला आहे. मात्र, रुळांच्या दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या काही वाढलेली नाही. सध्या सुमारे साडेतीन लाख ट्रॅकमेंटेनर कार्यरत आहेत. आधी ही संख्या साडेचार लाखांवर होती. त्यामुळे वाढलेल्या कामाचा ताण कर्तव्यावरील ट्रॅकमेंटेनरवर पडत आहे. परिणामी देशभरात पाच वर्षांत ४१० तर मध्य रेल्वेत दहा कर्मचारी रेल्वेगाडी खाली येऊन मृत्युमुखी पडले, असे सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनर युनियनने म्हटले आहे. यात पुणे विभागातील तीन ट्रॅकमेंटनरचा समावेश आहे.
मुंबई विभागात ४ हजार ७०० ट्रॅकमेंटेनरची पदे मंजूर आहेत. त्यापैकी १४०० पदे रिक्त आहेत. या रिक्तपदाचा भार कर्तव्यावरील कर्मचाऱ्यावार येतो. या अतिरिक्त कामाच्या तणावामुळे ट्रॅकमेंटेनर आत्महत्या करीत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. नागपूर विभागात मार्च २०१८ मध्ये पारस मीना या ट्रॅकमेंटेनरने आपल्या शासकीय निवासात गळफास घेतला होता. सोलापूर विभागात १५ ऑगस्ट २०१८ ला बबलूकुमार यांनी आत्महत्या केली तर उत्तर मध्य रेल्वेत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी रमेश यादव यांनी आत्महत्या केली, असा दावा सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनर युनियनने केला आहे.
ट्रॅकमेंटेनरला अतिरिक्त कामाचा ताण आहेच. पण, त्यातून थोडा दिलासा मिळावा म्हणून सुटी देखील दिली जात नाही. त्यामुळे ते कायम तणावात असतात. परिणामी, त्यांना अनेकदा गाडी कोणत्या रुळावरून येत आहे याचेही भान राहत नाही आणि ते गाडीखाली येतात.
– आर.एन. पासवान, सरचिटणीस, सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनर युनियन.
