नागपूर : देशात हवेच्या प्रदूषणातील दीर्घकालीन प्रभावामुळे २०१९ मध्ये १६ लाखांहून अधिक मृत्यू झाले. यूएस आधारित हेल्थ इफेक्ट द इन्स्टिटय़ूटकडून ग्लोबल एअर २०२० च्या निरीक्षणातून ही आकडेवारी समोर आल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर संस्थेचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी दिली. ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड यांसारख्या वायू प्रदूषकांच्या संयोगामुळे वायू प्रदूषण  होते. कारखाने आणि मोटार वाहनांच्या बिंदू स्त्रोतांमधून हे सर्वाधिक होते. वायू प्रदूषणातील दीर्घकालीन प्रभावामुळे २०१९ मध्ये देशात १.१६ लाख एक महिन्याच्या आतील अर्भकांचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण पक्षाघात, हदयविकार, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग असले तरी त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचे डॉ. गोगुलवार यांनी सांगितले.

ध्वनी प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर परिणाम

वाहनांचे कर्कश आवाज, डी.जे., लग्न समारंभातील वाद्यांचा आवाज, सायरन, फटाके, इमारतींचे बांधकाम, औद्योगिकरण, जनरेटर सेट्स, स्पिकर, संगीत संच, पाणबुडय़ांमधील ध्वनी लहरी, टी.व्ही. रेडिओ आणि इतर यांत्रिक उपकरणे यांच्या प्रमाणापेक्षा मोठय़ा आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाने  मानवाच्या मानसिक आरोग्यावर आणि प्राण्यांच्या शरीरावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मानवाला लवकर राग येणे, रक्तदाब वाढणे, हृदयात धडधड, लक्ष विचलित होणे, चिडचिड, कार्यक्षमता कमी होणे, पचनक्रियेत बदल, गर्भातील बाळावर परिणाम जाणवतो. जे कर्मचारी मोठय़ा आवाजांच्या यंत्राजवळ काम करतात, त्यांना म्हातारपणामध्ये कर्णबधिरता लवकर येण्याचा धोका असल्याचेही डॉ. गोगुलवार यांनी सांगितले.

८० टक्के पोटांचे आजार दूषित पाण्यामुळे

दूषित पाण्यामुळे कॉलरा, विषमज्वर, अमांश, कावीळ अतिसार असे आजार होतात. जवळपास ८० टक्के  पोटांचे आजार प्रदूषित पाणी पिल्याने होतात. देशात ८० टक्के जलस्त्रोत प्रदूषित आहेत. या पाण्याचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो. शहरीकरण वा औद्योगीकरणामुळे दूषित झालेल्या सांडपाण्यातून पिण्याच्या पाण्यात रासायनिक घटक मिसळतात. तसेच शेतीसाठी लागणारी रासायनिक खते व कीटकनाशके इत्यादीचे मिश्रित शेतातील पाणी  विहिरी, तळी यांच्या संपर्कात आल्यामुळे तेथील पाणी दूषित होते. हे  पाणी पिण्यामुळे  कर्करोग, त्वचारोग, मानसिक आजार संभवतात. याशिवाय मानवी कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य यामुळेही पाणी दूषित होत असल्याचे डॉ. गोगुलवार यांनी स्पष्ट केले.

हॉर्न, डीजेचा वापर कमी व्हावा

 नागरिकांना वाहनांच्या हॉर्नचा कमीत कमी वापराची सवय लावायला हवी. उत्सवादरम्यान डीजेचा आवाज कमी असावा. रात्री १० नंतर डीजेचा वापर टाळावा. हवेचे प्रदूषण टाळण्यास अधिकाधिक वृक्ष लागवड करून ते वाढवावेत. शक्यतोवर अधिक प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. मानसिक संतुलन साधण्यास गाणे गावे किंवा ऐकावे, वाद्य वादन, चित्रकला, पाक कला, शिल्पकला आणि यासारखे आवडणारे छंद जोपासावेत, असेही डॉ. गोगुलवार यांनी सांगितले.