गोंदिया: तालुक्यातील ग्रामपंचायत इर्री येथे परिचर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील २७ महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. अखेर त्याने ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवार ३१ मे रोजी दुपारी घडली. रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री असे परिचराचे नाव आहे. त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील २७ महिन्यांपासून परिचराला वेतन देण्यात आले नाही. ग्रामसेवक नरेश बघेले यांच्या उदासीन धोरणामुळे इर्री ग्राम पंचायत डबघाईस गेली आहे. आधीच तुटपुंजे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येते. पण ते ही वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांनी जगायचे कसे, असा सवाल ग्राम पंचायत युनियनचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी केला आहे. परिचर रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री हे आपल्या वेतना संदर्भात जेव्हा -जेव्हा ग्रामसेवकाला बोलत होते तेव्हा ते त्याला कामावरून कमी करण्याची धमकी द्यायचे, असा आराेप आहे. हा ताण असहय झाल्याने रमेशने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision taken to end life as no salary for 27 months gondiya sar 75 amy