|| महेश बोकडे

२०१८ च्या तुलनेत २०२१ मधील स्थिती वाईट

नागपूर : मुलींच्या जन्मदरात सुधारणेसाठी केंद्र व राज्य सरकार जनजागृती करीत असते. परंतु वर्ष २०१८ च्या तुलनेत १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ मध्ये राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात घट झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनावश्यक आकडेवारी कार्यालयातील नोंदणीतून पुढे आले आहे. २०१८ मध्ये राज्यात प्रत्येक १०० मुलांमागे ९१.६ मुलींचा जन्म झाला. २०२१ मध्ये ही संख्या आणखी कमी होऊन प्रत्येक १०० मुलांमागे ९०.४ मुलींचा जन्म नोंदवला गेला.

राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण १७ लाख ६५ हजार ८०२ बालकांना जन्म झाला. त्यात ९ लाख २१ हजार ८२५ मुले, ८ लाख ४३ हजार ९७७ मुलींचा समावेश होता. त्यामुळे प्रत्येक १०० मुलांमागे ९१.६ मुलींचा जन्म झाला. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान १७ लाख ४७ हजार २३ बालकांना जन्म झाला. त्यात ९ लाख १० हजार २२६ मुले, ८ लाख ३६ हजार ७९७ मुलींचा समावेश होता. यावेळी मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९१.९ असे किंचित सुधारले. करोना काळ असलेल्या १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान १६ लाख ६६ हजार १६२ बालकांचा जन्म झाला. त्यात ८ लाख ७० हजार ९०८ मुले, ७ लाख ९५ हजार २५४ मुलींचा समावेश आहे. यावेळी मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९१.३ होते.

दरम्यान, १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ दरम्यान राज्यात ८ लाख ३१ हजार ८०९ बालकांचा जन्म झाला. त्यात ४ लाख ३६ हजार ८५९ मुले, ३ लाख ९४ हजार ९५० मुलींचा समावेश आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात घट होऊन मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९०.४ इतके असल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. या विषयावर आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नागपूर, मुंबईहून पुण्यातील चित्र गंभीर 

मुंबईत २०२० मध्ये ६२ हजार १७४ मुले, ५८ हजार १४ मुली अशा एकूण १ लाख २० हजार १८८ बालकांचा जन्म झाला. येथे प्रत्येक १०० मुलांमागे ९३.३ मुली जन्मल्या. २०२१ मध्ये (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत) मुंबईत ३४ हजार २४७ मुले, ३१ हजार ५३८ मुली अशा एकूण ६५ हजार ७८५ बालकांचा जन्म झाला.  म्हणजे, प्रत्येक शंभर मुलांमागे ९२.१ मुली जन्मल्या. नागपुरात २०२० मध्ये ३२ हजार ४५० मुले, ३० हजार ४८३ मुली अशा एकूण ६२ हजार ९३३ बालकांचा जन्म झाला. येथे प्रत्येक १०० मुलांमागे ९३.९ मुली जन्मल्या. २०२१ ची माहिती आरोग्य विभागाला नागपुरातून उपलब्ध झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात सांगण्यात आले. पुण्यात २०२१ मध्ये ७० हजार ७५६ मुले, ६५ हजार ३८८ मुली अशा १ लाख ३६ हजार १४४ बालकांचा जन्म झाला. येथे प्रत्येक शंभर मुलांमागे ९२.४ मुली जन्मल्या. २०२१ मध्ये येथे ३५ हजार ५३४ मुले, ३२ हजार ३७१ मुली अशा ६७ हजार ९०५ बालकांचा जन्म झाला. येथे प्रत्येक शंभर मुलांमागे ९१.१ मुली जन्मल्या.