प्राणवायू पुरवठा बंद केल्याने उत्पादनात घट

 धोरण निश्चित करण्याची विदर्भातील उद्योजकांची मागणी  

(संग्रहित छायाचित्र)

अविष्कार देशमुख

राज्य सरकारने उद्योगक्षेत्राला लागणारा प्राणवायूचा पुरवठा बंद केल्याने विदर्भातील औद्योगिक उत्पादनात जवळपास ५० ते ७० टक्के घट झाली आहे. प्राणवायूच्या अभावामुळे इंजिनिर्अंरग आणि फेब्रिकेशनचे काम  बंद झाले असून उद्योगक्षेत्रात कोट्यवधींचे नुकसान होत आहे. प्राणवायू आधी रुग्णांना मिळावे, अशी भावना देखील उद्योगक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. परंतु, यासोबतच परिस्थिती सुरळीत झाल्यावर राज्य सरकारने या संदर्भात धोरण निश्चित करण्याची मागणीही उद्योजकांकडून होत आहे.

सध्या अवघ्या राज्यात प्राणवायूचा तुटवडा आहे. सरकारने फक्त आरोग्याच्या वापरासाठी प्राणवायूचा पुरवठा होईल, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या उद्योगाला प्राणवायूचा पुरवठा बंद आहे. आधी सरकारने ८० टक्के प्राणवायू वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि २० टक्के प्राणवायू उद्योगक्षेत्राला मिळेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे उद्योगक्षेत्र काही प्रमाणात सुरू होते. मात्र झपाट्याने रुग्णसंख्या वाढली आणि प्राणवायूची कमतरता भासत असल्याने टाळेबंदीनंतर सरकारने शंभर टक्के प्राणवायू केवळ वैद्यकीय सेवेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  उत्पादनात मोठी घट झाली आहे. विदर्भातील उद्योग अडचणीत आले असून काही लघु व मध्यम उद्योगांवर टाळे लावण्याची वेळ आली आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये जवळपास पंधरा हजारपेक्षा अधिक छोटे मोठे उद्योग आहेत. यापैकी बहुतांश उद्योगाला प्राणवायू गरजेचा आहे. विदर्भात मोठ्या संख्येने इंजिनिर्अंरग व फेब्रिकेशन उद्योग असून तेथे लोखंड कापण्यापासून तर इतर कामासाठी प्राणवायूचा मोठा उपयोग केला जातो . प्राणवायूअभावी उत्पादनात घट झाल्याने  सरकारचा महसूलही बुडणार आहे.

सध्या उद्योगापेक्षा करोना रुग्णांना प्राणवायू मिळावा अशीच आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. प्राणवायूअभावी उद्योगक्षेत्राच्या उत्पादनात  मोठी घट झाली असली तरी भविष्यात प्राणवायू सर्व क्षेत्रासाठी मुबलक उपलब्ध असावा यासाठी राज्य सरकारने धोरण निश्चित करण्याची गरज आहे.

– नितीन लोणकर, माजी अध्यक्ष, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decreased production due to shutdown of oxygen supply abn