नागपूरः दीक्षाभूमी स्मारक समितीमधील वाद चांगलाच चिघळला आहे. समिती दोन गटात विभागल्यानंतर एकमेकांवर आरोप करण्यात आल्यानंतर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांना समितीमधून काढण्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान समितीचा वाद पोलीस ठाण्यात गेला असून सदस्य विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, शरद मेशाम आणि मिलिंद थूल यांच्या विरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राचार्याच्या खोलीचे कुलूप तोडल्याची तक्रार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे (दीक्षाभूमी) कार्यालय आणि महाविद्यालय प्राचार्यांच्या खोलीचे कुलूप तोडल्या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी समितीचे सदस्य विलास गजाघाटेसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक, भंते सुरेई ससाई यांच्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण यांनी गंभीर दखल घेत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

भंते ससाई यांची तक्रार

दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरेई ससाई यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे कामकाज चालविले जाते, अध्यक्षच कामकाज पाहतात. २४ जुलै रोजी समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, मिलिंद थूल आणि शरद मेशाम यांनी अनधिकृतपणे दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्यालयात बैठक घेतली.

बैठकीत समितीचे इतरही सदस्य होते. इतर सदस्य निघून गेल्यावर गजघाटेसह चौघांनी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास समिती कार्यालयाचे कुलूप तोडले आणि लगेचच स्वत:जवळील दुसरे कुलूपही लावले. या प्रकारामुळे महाविद्यालयातील कामे थांबली. त्यानंतर महाविद्यालय प्राचार्यांच्या खोलीचे कुलूप तोडले आणि दुसरे कुलूप लावले. त्यांच्या तक्रारीची पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. गजघाटेसह चौघांही विरुद्ध बीएनएस प्रमाणे कलम ३३२ (सी), ३३४ (१), ३३४ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला.

ससाई म्हणाले..

यासंदर्भात भदंत सुरेई ससाई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची (दीक्षाभूमी) बदनामी तसेच समितीविरुद्ध कृत्य केल्या प्रकरणी समितीच्या संंविधानानुसार कारवाई करीत विलास गजघाटे यांचे (५ जुलै २०२६) गव्हर्निंग बॉडीचे सदस्यत्व रद्द केले. त्यांना समितीच्या पदावरून कायमस्वरुपी काढण्यात आले. यानंतरही त्यांनी अनधिकृतपणे बैठक घेतली आणि कुलूप तोडले.

गजघाटे यांना केले होते अध्यक्ष

स्मारक समितीमध्ये भंते ससाई आणि महासचिव राजेंद्र गवई यांचे दोन गट आहे. भंते मनमानी कारभार असल्याचा आरोप करीत गवई गटाने बैठक घेऊन विलास गजघाटे यांना अध्यक्ष केले होते. तसेच ससाई यांना पद आणि समितीमधून काढून टाकण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु भंते ससाई यांनी त्यांना बैठक घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत गजघाटे यांनाच समितीमधून बाहेर केल्याचा दावा केला होता.