नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर १४ एप्रिलनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील १२ वर्षांपासून हा कार्यक्रम दरवर्षी होतो. मात्र, यावर्षी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी परवानगी नाकारल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची, माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीचे डॉ. सुचित बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बागडे म्हणाले, कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी आम्ही महिनाभरापूर्वी भंते सुरई ससाई यांच्या कार्यालयात लेखी अर्ज दिला. त्यानंतर आम्ही परवानगी घेण्यासाठी गेलो असता भंते ससाईंनी तुमचा अर्जच मिळाला नसल्याचे सांगून परवानगी नाकारली. १४ एप्रिलला समितीच्या वतीने सायंकाळी ६ ते ९ दरम्यान वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नाशिक येथील प्रसिद्ध विचारवंत निरंजन टकले यांचे ‘डॉ. आंबेडकरांचे विचार आणि वर्तमान भारतातील त्यांची प्रासंगिकता’, तसेच नांदेडचे वक्ता डॉ. अनंत राऊत यांचे ‘लोकशाही आणि वर्तमान काळातील आव्हाने’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
परंतु, परवानगी न मिळाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. दोन आठवड्यांत एखाद्या रविवारी हा कार्यक्रम नागपूर शहरात इतर ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. एस. बी. गेडाम, डॉ. अशोक उरकुडे, डॉ. प्रदीप आगलावे आदी उपस्थित होते.
स्मारक समितीतील बहुतांश सदस्य आमच्या बाजूने
दीक्षाभूमीवरील कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही परवानगी न घेतल्यामुळे भंते ससाईंनी कार्यक्रम घेण्यास मनाई केली. त्यावर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला दोन तासांचा वेळ द्या, प्रमुख वक्त्यांना बोलू द्या. त्यानंतर त्याच व्यासपीठावर तुम्ही तुमचा कार्यक्रम घ्या, असा मध्यम मार्ग पुढे ठेवला.
परंतु,, त्यानंतरही आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे डॉ. बागडे म्हणाले. स्मारक समितीतील बहुतांश सदस्य आमच्या बाजूने आहेत. परंतु, भंते सुरई ससाईंना काही व्यक्ती चुकीची माहिती देत असल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. धर्मगुरूंशी वाद नको म्हणून आम्ही नमते घेतले, असेही ते म्हणाले.
