नागपूर : शिंदे गटाचे नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे भोंदूबाबा अशोक खरातचे निस्सिम भक्त होते. खरात दैवी शक्ती असल्याचा दावा करत असल्याने त्यांच्या सांगण्यावरूनच केसरकर मंत्रालयात जायचे की नाही हे ठरवायचे. तर अनेक बैठकांसाठीही खरात यांनी परवानगी दिल्यावर केसरकर हजेरी लावत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

एका महिलेच्या तक्रारीमुळे भोंदूबाबा अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे प्रकार समोर आले आहेत. या भोंदूबाबाकडे भविष्य जाणून घेण्यासाठी किंवा अडचणी सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसह बड्या, प्रतिष्ठित कुटुंबांतील मंडळी व महिला जात होत्या, असे सांगितले जाते. यात शिवसेनेचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री केसरकर यांचाही समावेश होता. ते खरात यांचे भक्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केसरकर मंत्री असताना यांच्या मंत्रालयाच्या कामात खरात हस्तक्षेप करीत होता. त्याच्या सांगण्यावरूनच केसरकर मंत्रालयात जायचे की नाही ठेरवायचे. खरातने सांगितलेल्या शुभ दिवसीच केसरकर शिक्षण विभागाच्या बैठकाही घेत असल्याचा आरोप आहे. खरातने नकार दिल्याने केसरकरांनी अनेकदा बैठकाही रद्द केल्याची माहिती आहे. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्रीच अशा भोंदूबाबांचे भक्त असतील तर इतरांचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केसरकरांनीच शिंदेंची भेट घडवून दिली होती?

अशोक खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक राजकीय नेते भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात अधिक चर्चेत आला. ही भेट दीपक केसरकर यांनीच घडवून आणल्याचा आरोप आहे. शिंदे यांच्या पूर्वीपासून केसरकर खरातच्या संपर्कात होते.

दोन दिवस केसरकरांच्या बंगल्यावर मुक्काम

केसरकर शिक्षण मंत्री असताना त्यांच्या खात्यातील अनेक बदल्या आणि बढत्या खरात याच्या आदेशाने होत होत्या, असा आरोप झाला आहे. याशिवाय खरात आठवड्यातून दोन दिवस केसरकर यांच्या शासकीय बंगल्यावर मुक्काम करायचा अशीही माहिती आहे. केसरकरांची खरातशी इतकी जवळीक पाहता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खरात आणि माझ्या संबंधांवर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या मंदिरात माझी ये-जा होती. मंदिरात जाणे गैर कसे असू शकते? खरात याच्या सांगण्यावरून मी मंत्रालयात जायचो किंवा बैठका घ्यायचो हे सर्व आरोप खोटे आहेत. समाज माध्यमांवरील छायाचित्रही मंदिरात भेट दिली ते आहेत. इतर गोष्टींवरून संबंध जोडणारे सर्व आरोप खोटे आहेत. चुकीची माहिती पसरवली जात आहे. – दीपक केसरकर, आमदार, माजी शालेय शिक्षण मंत्री.