नागपूर : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांची पाच वर्षांनंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर मेळघाट वनविभागात पाच वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
गोळी झाडून आत्महत्या करावी लागली, कारण..
दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. वनक्षेत्रातील अतिक्रमण, अवैध वृक्षतोड आणि वन्यजीव गुन्ह्यांविरोधात कारवाईसाठी त्या आक्रमक अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे वनवर्तुळात त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून संबोधले जात होते. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा, अपमानास्पद वर्तनाचा आणि कामाच्या दबावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यांच्या वर्तनाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी २६ मार्चला विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वेस्थानकावरून अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर वनबलप्रमुखांनी ३१ मार्च २०२१ रोजी विभागीय चौकशीसाठी समिती स्थापन केली.
चौकशी आणि अहवालाचे गुढ कायम
दरम्यान, या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत असताना राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे तपास सोपवला. या प्रकरणात मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना नागपूर येथून अटक करण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची निर्दोष मुक्तता झाली. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तब्बल वर्षभर निलंबित देखील करण्यात आले होते. दीपाली चव्हाण यांच्या चिठ्ठीतील आरोप, त्यानंतर झालेली अटक, विभागीय चौकशी आणि पोलीस तपास यामुळे २०२१ मध्ये हे प्रकरण राज्यभर गाजले होते. मात्र, आता पाच वर्षांनंतर न्यायालयीन प्रक्रियेत विनोद शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
तिचे धाडसच ठरले घातक
२०१८ मध्ये धारणी येथून २५ किलोमीटर अंतरावरील हरिसाल येथे वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दीपालीला पोस्टिंग मिळाली आणि २०१९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोणीटाकळीचे राजेश मोहिते यांच्याशी तिचे लग्न झाले. अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात कार्यरत राजेश यांची चांगली साथ दीपालीला लाभली. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी तिची ओळख होती. येथेही तिने तिची जबाबदारी धाडसाने पार पाडली. अवैध लाकूडतोड, वनतस्कर यांच्यात तिने दहशत निर्माण केली होती. तिची रेंज (कार्यक्षेत्र) कामाच्या बाबतीत सर्वांत आघाडीवर होती, त्यामुळे इतर रेंजमध्ये तिच्याबद्दल साहजिकच असूया होती. इथूनच तिच्या बाबतीतल्या दुष्टचक्राला सुरुवात झाली. मेळघाटातील अनेक गावांचे तिने अतिशय चांगल्या पद्धतीने पुनर्वसन केले होते. मात्र, तिची ही धडाडी तिच्यासाठी शाप ठरली, असे म्हणावे लागेल. कर्तव्य बजावताना कठोर, पण आतून अतिशय हळव्या असलेल्या दीपालीचा येथेच घात झाला.
