नागपूर : ‘लाईनमन’ हा शब्द परंपरेने पुरुष कर्मचाऱ्यांशी जोडला गेला; पण जिद्द, कौशल्य आणि सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य यामुळे नागपूरच्या दीपाली खोब्रागडे यांनी हा समज मोडीत काढला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)मध्ये कार्यरत असलेल्या दीपाली यांचा (आज) ४ मार्च रोजी नवी दिल्ली येथे ‘लाईनमन दिना’निमित्त राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे. याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ या.
दीपालीसाठीचा हा विशेष सोहळा केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सीईए) आणि टाटा पॉवर- डीडीएल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून निवडलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये दीपाली या एकमेव महिला असल्याने नागपूरकरांसाठी तसेच महावितरणसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
आव्हानांतून घडलेली कारकीर्द
महावितरणमधील १२ वर्षांच्या सेवेत दीपाली यांनी सुरुवातीची सात वर्षे ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीत काम केले. पावसाळ्यातील खंडित पुरवठा, तांत्रिक बिघाड, दुर्गम भागातील दुरुस्ती अशी अनेक आव्हाने त्यांनी समर्थपणे पेलली. गेल्या पाच वर्षांपासून त्या नागपूर शहरातील महाल विभागांतर्गत जुन्या शुक्रवारी वितरण केंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वीज वितरण व्यवस्थेतील तांत्रिक दोष दूर करणे, ग्राहकांना अखंडित पुरवठा सुनिश्चित करणे, वीज बिल वसुलीची जबाबदारी पार पाडणे या सर्व कामांमध्ये त्यांची कार्यतत्परता अधोरेखित होते.
‘सुरक्षितता प्रथम’चा ध्यास
दीपाली यांच्या कामाचा गाभा म्हणजे सुरक्षितता. “सुरक्षा साधनांशिवाय काम करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे,” असे त्या ठामपणे सांगतात. स्वतःसह सहकाऱ्यांनीही वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर करावा, यावर त्या भर देतात.
दीपाली काय म्हणते…
ग्राहकांच्या घरातील अंधार दूर करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हेच आपल्या कामाचे खरे समाधान असल्याची भावना दीपाली व्यक्त करतात. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यातही त्या पुढाकार घेत असून स्मार्ट मीटर योजना आणि सौर ऊर्जा प्रकल्पांना त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या तांत्रिक क्षेत्रात दीपाली यांनी निर्माण केलेली ओळख केवळ वैयक्तिक यश नाही; तर ती अनेक तरुणींसाठी प्रेरणेचा दीप ठरू शकते. नागपूरच्या या कन्येचा दिल्लीतील राष्ट्रीय सन्मान राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
