scorecardresearch

गडचिरोली : व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत शिक्षण मंचातील वाद चव्हाट्यावर; संख्याबळ असूनही अध्यक्ष, सचिवांचा पराभव

एकेकाळी गोंडवाना विद्यापीठावर एकहाती वर्चस्व असलेल्या शिक्षण मंचामध्ये अंतर्गत वादातून दुफळी निर्माण झाली आहे.

गडचिरोली : व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत शिक्षण मंचातील वाद चव्हाट्यावर; संख्याबळ असूनही अध्यक्ष, सचिवांचा पराभव

सुमित पाकलवार

एकेकाळी गोंडवाना विद्यापीठावर एकहाती वर्चस्व असलेल्या शिक्षण मंचामध्ये अंतर्गत वादातून दुफळी निर्माण झाली आहे. रविवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटले. संख्याबळ असूनही शिक्षण मंचचे अध्यक्ष डॉ. अरुण कुमार आणि सचिव डॉ. रुपेंद्र गौर यांचा पराभव झाल्याने मंचात नेतृत्व बदलाची चर्चा होत आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

संघपरिवारातील महत्त्वाची संघटना म्हणून शिक्षण मंचाकडे बघितल्या जाते. विद्यापीठ क्षेत्रात या संघटनेचे मोठे जाळे असून येथील अनेकांनी विविध विद्यापीठात कुलगुरूंसारखी पदे भूषवली आहेत. परंतु गोंडवाना विद्यापीठात शिक्षण मंचात आता आलबेल नसल्याचे व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतून पुढे आले. रविवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत अभाविप आणि शिक्षण मंचाकडून प्राचार्य गटातून डॉ. अरुण प्रकाश, शिक्षक गटातून डॉ. रुपेंद्र गौर आणि पदवीधर गटात प्रशांत दोंतुलवार हे उभे होते. सध्याच्या अधिससभेतील संख्याबळाच्या विचार केल्यास हे तीनही सदस्य निवडून येतील, असा कयास बांधला जात होता. मात्र, यातून केवळ पदवीधर गटातील प्रशांत दोंतुलवार विजयी झाले. त्यांनी यंग टीचर्सचे दिलीप चौधरी यांचा पराभव केला. तर शिक्षण मंचचे अध्यक्ष डॉ. अरुण प्रकाश आणि सचिव डॉ. रुपेंद्र गौर हे दोघंही पराभूत झाले. त्यांना यंग टीचर्सचे डॉ. लेमराज लडके, डॉ. विवेक गोर्लावर यांनी मात दिली. हा निकाल सर्वानाच बुचकळ्यात टाकणारा होता. सुरवातीला व्यवस्थापन परिषद निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी सर्वच संघटनांचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे अभाविप व मंचचे स्वप्निल दोंतुलवार, गुरूदास कामडी आणि यंग टिचर्सचे प्रा. डॉ. संजय गोरे हे अविरोध निवडून आलेत. परंतु उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली.

हेही वाचा >>>नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत

प्रशासन आणि सदस्यांची नाराजी भोवली
मंचचे अध्यक्ष अरुण प्रकाश आणि सचिव रुपेंद्र गौर यांच्या कार्यशैलीमुळे केवळ संघटनेत नव्हे तर प्रशासनात देखील नाराजी आहे. अधिसभा निवडणुकीवेळेस उमेदवारीवरून देखील वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मंचाला कमी जागांवर समाधान मानावे लागले होते. यातून बोध घेत व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत तरी मंचाचे पदाधिकारी कार्यपद्धतीत बदल करतील असे वाटत होते. मात्र,पुन्हा तीच भूमिका घेतल्याने पराभवाचे तोंड पहावे लागले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 13:10 IST
ताज्या बातम्या