चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या राजस्थान येथे झालेल्या अधिवेशनात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रदेश काँग्रेस समितीत प्रदेश प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजूरकर या एकाच कुटुंबाला संधी देण्यात आली आहे.

या नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. काँग्रेसवर भाजप तथा इतर प्रमुख पक्षांकडून कायम घराणेशाहीचा आरोप केला जातो. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबासह इतर काही राजकीय कुटुंबांचीच मत्तेदारी दिसून येते. बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये काही विशिष्ट कुटुंबांचे पक्षात वर्चस्व आहे.प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करताना विशिष्ट कुटुंबांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. प्रदेश प्रतिनिधींमध्ये जिल्ह्यातून खा. धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे व त्यांचे बंधू अरुण धोटे, अविनाश वारजूरकर व त्यांचे बंधू सतीश वारजूरकर या तीन कुटुंबातील सहा सदस्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : ‘लंपी’ आजाराचा प्रभाव वाढतोय ; ३ जनावरांचा मृत्यू, ३८ बाधित

केवळ प्रदेश प्रतिनिधीच नाही तर पक्षात अशी अनेक पदे आहेत जी एकाच कुटुंबाकडे सोपवण्यात आलेली आहे. माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार तसेच त्यांची मुलगी शिवानी विजय वडेट्टीवार प्रदेश युवक काँग्रेसमध्ये पदाधिकारी आहेत. सोबतच आता गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदीही शिवानी निवडून आल्या आहेत. प्रदेश सचिव विनोद दत्तात्रेय यांची प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. त्यांचा मुलगा यश दत्तात्रेय एनएसयूआयमध्ये पदाधिकारी आहे.शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर व त्यांचे पती गोपाल अमृतकर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी आहेत. आ. सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे या एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांकडे पदे आहेत.