वर्धा : ताडोबातील वाघ आंध्र प्रदेशात वंश विस्तारासाठी गेले आणि वाघांचा ठिकठिकाणी बदल्या करण्याचा नवा अध्याय सुरू झाला. पण त्यांना नवा घरठाव मानवतोय ना, याची पुरेपूर काळजी घेतल्या गेली. नामीबिया येथील चित्ते भारतात रमले, त्यांचा संसार सुरू झाला, वंश वाढला ही बाब वन्यजीव प्रेमी व पर्यावरण क्षेत्रात आनंद निर्माण करून गेली. आता थंड प्रदेशातील वाघ उष्ण अशा मध्यप्रदेशात तर उष्ण प्रदेशातील वाघ कूल कूल डेहराडून येथे पोहचला. ही बाब इतिहास रचणारी म्हटल्या जात आहे.
भोला आणि तेजस
उत्तराखंडमधील प्रसिद्ध डेहराडूनचे प्राणीसंग्रहालय. गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेला येथील ५ वर्षांचा ‘भोला’ नावाचा रॉयल बंगाल टायगर आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालयाचा नवा पाहुणा बनला आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) प्राणी देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत ही महत्त्वपूर्ण अदलाबदल करण्यात आली असून, भोलाच्या बदल्यात ग्वाल्हेरहून ‘तेजस’ नावाचा नर पांढरा वाघ डेहराडूनमध्ये दाखल होत आहे.
कर्मचाऱ्यांचा भावूक निरोप
गेली दोन वर्षे भोलाची अत्यंत आपुलकीने देखभाल करणाऱ्या प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावूक करणारा ठरला होता. भोलाला विशेष वाहनात चढवताना कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. प्रवासापूर्वी डेहराडून प्राणीसंग्रहालयाचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप मिश्रा यांनी भोलाची सखोल वैद्यकीय तपासणी करून तो प्रवासासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दिले. वन्यजीव वहन प्रोटोकॉलचे कडक पालन करत उपविभागीय वन अधिकारी अभिषेक मैथानी, डॉ. मिश्रा, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) आणि अनुभवी केअरटेकर यांच्या विशेष ताफ्यासह भोलाला सुरक्षीतपणे ग्वाल्हेरकडे रवाना करण्यात आले.
उत्तराखंडला मिळतोय पहिला पांढरा वाघ
प्राणीसंग्रहालयातून सुमारे ५५० किलोमीटरचा लांबचा प्रवास करून येणारा ‘तेजस’ हा पांढरा वाघ डेहराडून प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू करणार असल्याचे म्हटल्या जाते. या हस्तांतरणामुळे उत्तराखंड राज्याला प्रथमच आपला पहिला श्वेतव्याघ्र (White Tiger) मिळणार असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र उमटले. यापूर्वी डेहराडूनमध्ये ‘भोला’ आणि ‘टी-२’ ही वाघांची जोडी पर्यटकांसाठी मोठे आकर्षण होती. भोलाच्या जाण्याने टी-२ एकाकी पडला असला, तरी तेजसच्या आगमनाने प्राणीसंग्रहालयाचे वैभव अधिक वाढणार आहे.
२० दिवसांचा अलगीकरण काळ
डेहराडून प्राणीसंग्रहालयाचे संचालक वैभव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार तेजसचे आगमन झाल्यानंतर त्याला लगेचच पर्यटकांसाठी मुख्य आवारात ठेवले जाणार नाही. नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि आरोग्य नियमांनुसार त्याला सुरुवातीचे सुमारे २० दिवस अलगीकरणात (Quarantine) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. सर्व वैद्यकीय चाचण्या आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तेजसला पर्यटकांच्या भेटीसाठी खुले केले जाईल. प्राणीसंग्रहालयाचा विस्तार करणे आणि पर्यटकांना दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन घडवणे, या उद्देशाने आगामी काळात देशभरातील इतर प्राणीसंग्रहालयांमधूनही नवनवीन प्रजाती आणल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
