बुलढाणा : ग्रामीण भागाचे बरे वाईट भवितव्य घडविणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार आता पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे! याचे कारण जिल्हा परिषद, पंचायत समित्यांप्रमाणेच आता ग्राम पंचायतींमध्येही प्रशासक राजवट येणार आहे. जिल्ह्यातील तब्बल ५३० ग्रामपंचायतींचा कारभार सरपंच व सदस्यांऐवजी अधिकाऱ्यांच्या हाती राहणार आहे. रखडलेल्या निवडणुका लक्षात घेता ग्रामपंचायतींमधील प्रशासक राज दीर्घ काळ राहणार, अशी चिन्हे आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील ५२५ ग्राम पंचायत ची मुदत चालू फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. बुलढाणा जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांची निवडणूक ओबीसी आरक्षण मुद्यावरून पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या निवडणुका कधी होणार हे ठरणार आहे. इतर जिल्हा परिषदाच्या निवडणुकाची धामधूम सध्या सुरु आहे. यामुळे नजिकच्या काळात बुलढाणा जिल्हा परिषदची निवडणूक लागणार आहे. यामुळे चालू महिन्यात मुदत संपणाऱ्या ५२५ ग्राम पंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहे.
यामध्ये बुलढाणा तालुक्यातील ५१, चिखली ६०, देऊळगाव राजा २६, सिंदखेड राजा ४३, लोणार १६, मेहकर ४०, खामगाव ७१, शेगाव ३४, जळगाव २४, संग्रामपूर २७, मलकापूर ३३, नांदुरा ४८ आणि मोताळा तालुक्यातील ५२ ग्राम पंचायतींचा समावेश आहे.
या ग्राम पंचायतचे नुकतेच विघटन झाल्याने फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतची संख्या आता ५३० झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने आता या ग्राम पंचायती मध्ये प्रशासक नेमण्यात येणार आहे. १३ पंचायत समित्यामधील विस्तार अधिकारी प्रवर्गातील अधिकाऱ्यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये सुद्धा मनमानी आणि अनियंत्रित कारभार पाहावंयास मिळणार आहे.
ग्रामीण भागात प्रशासक राज
ग्रामीण भागाच्या विकासाचा डोलारा जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्याची मुदत सन २०२२ मध्ये संपली. तेंव्हापासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारीच पाहत आहे. तेरा पंचायत समित्या मध्ये अधिकारीच सर्वेसर्वा आहेत. आता ५३० ग्राम पंचायत मध्ये हेच चित्र राहणार आहे. यामुळे ग्रामीण भागाचे भवितव्य आता अधिकाऱ्यांच्या हाती आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

