समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची मागणी

मराठा समाजासाठी सरकारने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी  मागणी मराठा समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

‘लोकसत्ता’च्या समाजमत उपक्रमात मराठा विद्या प्रसारक समाजाचे कोषाध्यक्ष शिरीष राजे शिर्के, मराठा युवा संघाचे महेश महाडिक, मराठा युवा संघाचे दत्ता शिर्के व मराठा महासंघाचे नरेंद्र मोहिते यांच्याशी  समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा केली असता त्यांनी वरील मत नोंदवले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज देण्याची घोषणा मागील सरकारने केली होती. पण त्यासाठी निधी नाही. मराठा समाजातील युवकांना याचा विशेष लाभ मिळत नाही. त्यामुळे सरकारने फक्त मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून  त्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी नरेंद्र मोहिते यांनी यावेळी केली.

मागील सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. नवीन सरकारने कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयातही टिकेल यासाठी प्रयत्न करावे, हे सरकार यासाठी सकारात्मक प्रयत्न करेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे शिरीष राजे शिर्के व नरेंद्र मोहिते म्हणाले.

मागील सरकारने लागू केलेल्या शैक्षणिक आरक्षणाचा  फायदा समाजातील तरुणांना होत आहे. मात्र त्याविषयी पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक जण यापासून वंचित आहेत. अनेकांनी जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र काढले नाही, त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे समाजबांधवांनीही याबाबत सजग होऊन जात प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन दत्ता शिर्के यांच्यासह इतरही प्रतिनिधींनी केले तसेच मराठा समाजाचे बनावट जात प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

सरकारच्या अनेक घोषणा केवळ कागदोपत्रीच आहेत. जिल्हा पातळीवर वसतिगृह निर्माण करणे, क्रिमिलेअरची मर्यादा वाढवणे आदींचा यात समावेश आहे. ‘सारथी’ कौशल्य विकास केंद्राचा फायदाही विदर्भातील मराठा समाजाला होत नाही.

समाजाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी वेळ न दिल्याने भेट झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पुणे जिल्ह्य़ातील राहुल फटांगळे या शिवप्रेमी तरुणाच्या हत्येची चौकशी करावी, नागपुरात मराठा भवन उभारणीसाठी मदत करावी, बर्डीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे रुघुजी भोसले यांचा पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मराठा आरक्षणासाठी एकूण ५८ मोर्चे निघाले. यात ४४ हून अधिकांनी त्यांचे प्राण गमावले. हजारो आंदोलकांवर गुन्हे नोंदवले गेले. मागील सरकारने  पहिल्या टप्प्यात ८२ आणि दुसऱ्या टप्प्यात २८८ गुन्हे मागे घेतले. पण, अद्यापही ३५ किरकोळ स्वरूपाचे व  इतर ४२ गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. नवीन सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून त्यांना समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे शिर्के व मोहिते यांनी यावेळी सांगितले.