नागपूर : नागपूरहून पुणे, हैदराबाद, बिलासपूर आणि इंदूरसाठी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. या गाड्यांना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे इंदूर गाडीला १६ डबे करण्यात आले, आता अजनी (नागपूर)-पुणे गाडीचा प्रतिसाद बघता या गाडीला देखील १६ डब्यांची मागणी जोर धरत आहे.
पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्सप्रेसच्या डबे वाढवण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील तिकीट बुकिंग सतत १३० टक्के पेक्षा जास्त नोंदवली जात असल्यामुळे काही प्रवाशांनी आणि स्थानिक संघटनांनी डबे वाढवण्याची मागणी केली आहे.
ही गाडी सध्या आठ डब्यांच्या रचनेत चालते, तरीही ही सेवा ८८१ किलोमीटरचा प्रवास सुमारे १२ तासांत पूर्ण करते आणि आठवड्यात सहा दिवस चालवली जाते. रेल्वे विभागाकडून १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुणे-अजनी मार्गावर सरासरी तिकीट बुकिंग १३०.६३ टक्के होती, तर परतीच्या मार्गावर १२७.०६ टक्के नोंदवली गेली. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, ही गाडी बहुतेक दिवसांमध्ये जवळजवळ पूर्ण क्षमतेने चालते.
प्रवासाचे वेळापत्रकही या सेवेला लोकप्रियतेची साक्ष देते. पुणे येथून सकाळी ६:२५ वाजता (मंगळवार वगळता) गाडी निघते आणि अजनी येथे सायंकाळी ६:२५ वाजता पोहोचते. परतीचा प्रवास अजनीहून सकाळी ९:५० वाजता सुरू होतो आणि पुण्यात रात्री ९:५० वाजता संपतो. या वेळापत्रकामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर प्रवासी सोयीस्कर वेळेत प्रवास करू शकतात.
पुणे-अजनी वंदे भारत एक्स्प्रेसची प्राथमिक देखभाल-दुरुस्ती नागपूर विभागाकडून केली जाते. नागपूर विभागाला डबे वाढवम्याचा प्रस्ताव द्यावा लागणार आहे. सध्या डबे वाढवण्याबाबत कोणतेही प्रस्ताव आलेले नाहीत, पण ही गरज आहे कारण गाडी नेहमीच पूर्ण क्षमतेने चालते, असे एका रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास वाढल्यामुळे ही मागणी अधिकच वाढली आहे. नागपूर आणि पुणे दरम्यान शिक्षण संस्था, आयटी हब आणि स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. प्रवाशांचा अनुभवावरून स्पष्ट झाला आहे.
दरम्यान, नागपूर-इंदूर वंदे भारत आधीच १६ डब्यांची करण्यात आली आहे. तर पुणे-अजनी मार्ग अजूनही आठ डब्यांतच चालतो. सतत भरलेल्या बुकिंग्स पाहता, पुणे-नागपूर वंदे भारतसाठी डबे वाढवणे गरजेचे ठरत आहे, जेणेकरून प्रवाशांना आरामदायी आणि वेळेवर सेवा मिळू शकेल.
