नागपूर : मध्यंतरी पावसाने उसंत दिल्याने नागपूरसह पूर्व विदर्भात डेंग्यूचा प्रभाव ओसरत होता. परंतु, १ ते ७ ऑक्टोबर २०२२ या सात दिवसांत पूर्व विदर्भात या आजाराचे २१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ९ रुग्ण नागपूर महापालिका हद्दीतील असल्याने येथे पुन्हा डेंग्यूचे सावट पसरणार काय, ही चिंता आरोग्य विभागाला आहे.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

पूर्व विदर्भात नव्याने आढळलेल्या २१ रुग्णांमध्ये नागपूर शहरातील ९, भंडारा ४, गोंदिया ३, चंद्रपूर ग्रामीण ३ चंद्रपूर महापालिकेतील २ रुग्णांचा समावेश आहे. नवीन रुग्णांमुळे पूर्व विदर्भात १ जानेवारी २०२२ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आढळलेल्या डेंग्यूग्रस्तांची संख्या ३४० रुग्णांवर पोहचली आहे. मध्यंतरी नागपूरसह पूर्व विदर्भात डेंग्यूग्रस्तांची संख्या वाढली होती. परंतु, सप्टेंबरच्या शेवटी हे रुग्ण कमी होताना दिसत होते. त्यामुळे आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला असतानाच ऑक्टोबरमध्ये पुन्हा रुग्ण वाढत आहेत.

हेही वाचा : नागपूर : बिबट्याने प्राणीसंग्रहालयात शिरून केली काळविटाची शिकार

नवीन रुग्णांमुळे १ जानेवारीपासून ७ ऑक्टोबरपर्यंत नागपूर शहरात आढळलेल्या रुग्णांची संख्या ५७, नागपूर ग्रामीण २८, वर्धा १५, भंडारा १४, गोंदिया १०७, चंद्रपूर ग्रामीण ४१, चंद्रपूर महापालिका १७, गडचिरोली ६१ अशी एकूण ३४० रुग्णांवर पोहचली आहे. आरोग्य विभागाने या आजाराचा मात्र सहाही जिल्ह्यांत एकही मृत्यू नोंदवला नाही, हे विशेष.