scorecardresearch

एसटीच्या जादा फेऱ्यांना तोटा झाल्यास आगार व्यवस्थापक जबाबदार

संपावरील कर्मचारी सेवेवर परतल्याने आता एसटी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्ववत होत आहे.

महेश बोकडे

नागपूर: संपावरील कर्मचारी सेवेवर परतल्याने आता एसटी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्ववत होत आहे. त्यामुळे उन्हाळी गर्दीच्या हंगामातील प्रवासी मिळवण्यासाठी एसटीने जादा बसफेऱ्या सुरू केल्या. त्या तोटय़ात चालू राहिल्यास संबंधित आगार व्यवस्थापकाला जबाबदार ठरवून कारवाई केली जाणार आहे. तसे संकेतही महामंडळाने दिले आहेत.

प्रथम करोना व त्यानंतर कर्मचारी संपामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती कोलमडली.  उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तब्बल साडेपाच महिन्याने एसटीचे संपावरील कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे पून्हा प्रवासी फेऱ्या सुरू झाल्या आहेत. आता उन्हाळय़ाचे दिवस बघता एसटीने चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी २२ एप्रिल ते १५ जून २०२२  दरम्यान जादा बस फेऱ्या सोडण्याचे ठरवले आहे. परंतु या जादा फेऱ्या चालवतांना त्या तोटय़ात चालू नये म्हणून आगार व्यवस्थापकांना काळजी घ्यायची आहे.

राज्यातील सर्व एसटी कार्यालयांना मिळालेल्या आदेशानुसार, सर्व एसटी आगारातील सर्व चालक आणि वाहकांना किमान उत्पन्नाचे उद्दिष्ठ दिले जाणार आहे. तसेच एखाद्या मार्गावर प्रवासी भारमान कमी होताच तातडीने तेथील फेऱ्या पुढे स्थगीत कराव्या लागतील. हंगामात कुण्या आगारात बसेस पडून असल्यास त्याचाही वापर इतरत्र करावा लागेल. बसेस विविध मार्गावर धावतांना मार्गस्थ बिघाड व रद्द किलोमिटरचे प्रमाण कमीत कमी राहिल याचीही संबंधीताला काळजी घ्यावी लागणार आहे. मनुष्यबळाचेही आवश्यक नियोजन करण्यासह सुरवातीच्या ठिकाणी ३० टक्के थेट प्रवाशी असल्यास मंजूरी व्यतिरिक्त त्या मार्गावर जादा फेरी चालवण्याच्याही महामंडळाने सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत.

कमी अंतराच्या फेऱ्यांना प्राधान्य

महामंडळाने सर्व  विभाग नियंत्रकांना सरसकट अंतरप्रादेशिक लांब पल्याच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याऐवजी  कमी अंतराच्या फेऱ्या प्रथम प्राधान्याने सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Depot manager responsible loss extra rounds st employees strike ysh

ताज्या बातम्या