…अन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुलेटवर स्वार होऊन सर्वांना केले चकित

बुलेटवर स्वार होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारलेला फेरा जनतेत चांगलाच चर्चेत आला.

…अन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुलेटवर स्वार होऊन सर्वांना केले चकित
( बुलेटवर स्वार होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला फेरा )

वर्धा : बुलेटवर स्वार होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारलेला फेरा जनतेत चांगलाच चर्चेत आला. निमित्य होते हर घर तिरंगा उपक्रमाचे.

आज उपमुख्यमंत्री सेवाग्रामला या उपक्रमात सहभागी झाले. त्यानंतर त्यांचा चरखाघरचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी त्यांनी महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. येथून पुढे जिल्हा भाजपने बाईक रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीस झेंडी दाखविण्याची त्यांना जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी विनंती केली. तसेंच प्रत्यक्ष गाडी चालवून युवकांचा उत्साह वाढवावा, असेही सुचवले. त्यास क्षणाचाही विचार न करता फडणवीस यांनी होकार भरला.

गफाट यांच्याच बुलेटचे हँडल पकडून त्यांनी बैठक मांडली. त्यांच्या या तत्पर कृतीने सर्वच अवाक झाले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी हे कसं काय, असा उत्सुकतेने प्रश्न केला. त्यावर फडणवीस म्हणाले, की मी महाविद्यालयात असताना बुलेट चालवायचो. आता तर ऑटोमॅटिक बटनवर चालणाऱ्या बुलेट गाड्या आहेत. त्यावेळी तर किक मारून गाडी सुरू करण्याची कसरत होती. असे म्हणून त्यांनी गाडी स्टार्ट केली. मागच्या सीटवर जिल्हाध्यक्ष गफाट होते. सोबत दुसऱ्या बुलेटवर खासदार रामदास तडस स्वार झाले होते.

उपमुख्यमंत्री व खासदार यांच्या नेतृत्वातील ही रॅली लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. काही अंतरावर थांबून फडणवीस मग भोयर यांच्या गाडीत बसून त्यांच्या घरी रवाना झाले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy chief minister fadnavis surprised everyone by riding a bullet amy

Next Story
पुणे : स्वातंत्र्यपूर्व संस्थानांमधील दुर्मीळ मुद्रांकांचे १३ आणि १५ ऑगस्टला विद्यापीठात प्रदर्शन
फोटो गॅलरी