लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरकरांना चोवीस तास पाण्याचे स्वप्न दाखवून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सला (ओसीडब्लू) सत्ताधाऱ्यांनी कंत्राट दिले. परंतु, या योजनेवर आतापर्यंत ३ हजार २५० कोटी खर्चूनही शहरातील अनेक वस्त्या कोरड्याच आहेत. या योजनेत मोठा घोटाळा झाला असून विश्वराज इन्फ्रा व वीओलिया कंपन्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

योजनेला बारा वर्षे होऊनही अनेक वस्त्यांमध्ये २४ तास पाणी नाही. काही भागांतील नागरिक दूषित पाणी पित आहेत. कामात कसूर करणाऱ्या ओसीडब्लूला अकरा महिन्यांपूर्वी महापालिकेने कंत्राट रद्द करण्याची नोटीस दिली. परंतु कारवाई झोलली नाही. करारानुसार १ मार्च २०१७ पासून शहरवासीयांना २४ बाय ७ तास पाणी पुरवठा मिळणे अपेक्षित होते. मात्र सध्या ४ ते ५ दिवसांपासून काही भागातील पाणी बंद आहे.

आणखी वाचा-“प्रत्यक्ष निकालात केंद्रातले सरकार…” एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत काय म्हणाले विजय वडेट्टीवार? वाचा…

काही भागांत एकदिवसाआड पाणी येते. काही भागात फक्त अर्धा तासच पाणी मिळते. पाण्याचा दबाव कमी असल्याने आवश्यकतेनुसार पाणी मिळत नसल्याची अनेक वस्त्यांतील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेत २००७ पासून किती खर्च झाला, याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि झालेले नुकसान विश्वराज इन्फ्रा, वीओलिया वॉटर या कंपनीकडून वसूल करावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

‘ओसीडब्लू’ मालामाल

संपुआ सरकारच्या काळात जेएनएनयूआरएम अंतर्गत एक हजार कोटी रुपये महापालिकेने पाणी पुरवठा योजनेवर खर्च केले. तसेच नागपूरकरांचे १ हजार ६०० कोटी रुपये बारा वर्षात ओसीडब्लूला दिले. अमृत योजना १ आणि २ अंतर्गत मंजूर ६५० कोटी असे तब्बल ३ हजार २५० कोटी रुपये गेल्या बारा वर्षात पाणी पुरवठा सेवेसाठी खर्च करण्यात आले. यानंतरही असमान पाणी पुरवठा तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा सुरूच आहे, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! अंगणात झोपलेल्या व्यक्तीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवले; गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा गावातील घटना

नागपूकर इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासाठी जादा पैसे मोजत आहेत. ओसीडब्लूच्या फायद्यासाठी महापालिकेने मागील १३ वर्षांत १२ वेळा दरांत वाढ केली. त्यामुळे पाण्याचे दर ५ रुपये प्रति युनिटवरून ९ रुपये युनिटवर गेले. दुसरीकडे नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नावावर चांगले रस्ते खोदून त्यांची दुरूस्ती न करता तसेच सोडण्यात आल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला असून पाणी प्रश्न सुटला नाही व या कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही ठाकरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.