Despite strong protests, the forest department sent three elephants from Patanil to Gujarat in gadchiroli | Loksatta

वन खात्याच्या हत्तींचेही खासगीकरण; विरोध झुगारून गुजरातमध्ये रवानगी; प्राणीप्रेमींमध्ये संताप

वन विभागाच्या ताफ्यातील हत्तींना वन कर्मचाऱ्यांचा दर्जा असतो. त्यांची स्वतंत्र अशी सेवापुस्तिकाही असते.

nl elephant
वन खात्याच्या हत्तींचेही खासगीकरण; विरोध झुगारून गुजरातमध्ये रवानगी; प्राणीप्रेमींमध्ये संताप

गडचिरोली : वन विभागाच्या ताफ्यातील हत्तींना वन कर्मचाऱ्यांचा दर्जा असतो. त्यांची स्वतंत्र अशी सेवापुस्तिकाही असते. त्यांना सहज कोणत्याही खासगी हातात सोपवता येत नाही. मात्र, या सर्व नियमांकडे डोळेझाक करून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीजवळील पातानील हत्तीकॅम्प येथील वन विभागाचे तीन हत्ती गुरुवारी मध्यरात्री गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे, हत्ती गुजरातला पाठवण्याला प्रचंड विरोध असतानाही तो झुगारून हत्तींची रवानगी करण्यात आली.

येथील हत्ती गुजरातमधील एका व्यक्तीच्या मालकीच्या खासगी अभयारण्यात हलवण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून या निर्णयाला विरोध सुरू होता. या भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी हत्तींच्या स्थलांतराविरोधात असल्याने आदेश मिळूनही हत्ती हलवण्यात आले नव्हते. मात्र, चार दिवसांपूर्वी आलापल्ली वन विभागाला वरिष्ठ स्तरावरून पातानील येथील हत्ती हलवण्याबाबत पत्र मिळाले. त्यानुसार मध्यरात्री  रिलायन्स उद्योग समूहाद्वारे संचालित गुजरातच्या जामनगर येथील राधा कृष्ण वेल्फेअर संस्थेची तीन विशेष वाहने पातानील येथे दाखल झाली. रात्री येथील तीन हत्तींना या विशेष वाहनांमधून जामनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले. ही माहिती कळताच नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. समाज माध्यमात देखील या निर्णयाविरोधात मोहीम चालवण्यात येत आहे.  या स्थलांतराविरोधात असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचिकादेखील केली होती. गेल्या आठवडय़ात ती याचिका फेटाळण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

झाले काय?

गुजरातमधील खासगी अभयारण्यात वन खात्याचे तीन हत्ती नेण्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होत आहे. या प्रकाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून समाजमाध्यमांवर देखील हत्तीचे हे स्थलांतर रोखावे अशी मागणी स्थानिक पातळीवर झाली होती. याचिका फेटाळल्यानंतर तातडीने हत्ती एका रात्रीत गुजरातमध्ये हलविण्यात आले.

नवे प्रश्न उपस्थित..

वन विभागाच्या अखत्यारीतील हत्ती असे खासगी संस्थेला सोपवता येतात का? हत्तीच्या नावे असलेल्या सेवापुस्तिकेचे पुढे काय होणार? या हत्तींची काळजी घेणारा माहूत हा पगारी नोकरदार असतो, त्याच्या समायोजनाचे काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत

कमलापूरमधूनही..

वन विभागाला मिळालेल्या आदेशानुसार या भागातील एकूण आठ हत्तींचे जामनगरला स्थलांतर करायचे होते. त्यापैकी तीन रवाना करण्यात आले. आता कमलापूर हत्तीकॅम्प येथील उर्वरित पाच हत्ती देखील लवकरच पाठवण्यात येतील, अशी चर्चा वन विभागात सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2022 at 11:15 IST
Next Story
गांधीबाग झोनमध्ये मलवाहिन्या फुटण्याची समस्या ; तक्रार करूनही लक्ष देत नसल्याने नागरिकांची नाराजी