नागपूर : वातावरण बदलाचा परिणाम आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित घटकांवर होत असतो, तसाच तो आता महाराष्ट्राच्या सौर आणि पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमता विकसनावरही होणार असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा विकसनासाठी सुरू असलेल्या जोरदार प्रयत्नांबाबत पुणे येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’ (आयआयटीएम) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. ‘अ‍ॅनालिसिस ऑफ फ्यूचर विंड अँड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स’ हा अभ्यास नुकताच ‘करंट सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. भू-विज्ञान मंत्रालयाअंतर्गत (मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस) असलेल्या आयआयटीएम, पुणे येथील टीएस आनंद, दीपा गोपालकृष्णन आणि पार्थसारथी मुखोपाध्याय तसेच, न्यूयॉर्क विद्यापीठ अबुधाबी येथील ‘सेंटर फॉर प्रोटोटाइप क्लायमेट मॉडेलिंग’ येथील संशोधकांचा यामध्ये समावेश आहे.

भारतीय उपखंडातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातले पवन आणि सौरऊर्जेच्या अंदाजाचे पुढील चार दशकांसाठी विश्लेषण करण्यासाठी संशोधकांनी ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’द्वारा (आयपीसीसी) तयार केलेल्या अत्याधुनिक हवामान मॉडेल्सचा वापर करून हा अभ्यास केला आहे. महाराष्ट्र आणि शेजारच्या प्रदेशात पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमतेबाबत बहुतांश हवामान मॉडेल्समध्ये सकारात्मक कल दिसून येतो. मोसमी पावसाचे महिने येत्या काही वर्षांत अधिक वादळी आणि ढगाळ राहणार आहेत. या प्रदेशात भविष्यात सकारात्मक क्षमता कल दिसून येत असल्याचे मत, या अभ्यासात नोंदवतानाच ही क्षमता मात्र उर्वरित मध्य भारताप्रमाणे नसेल, असेही सांगितले आहे. वातावरण बदलाचा अक्षय ऊर्जास्रोतांवर होणाऱ्या परिणामांच्या अंदाजाबाबत हा अभ्यास महाराष्ट्राची या क्षेत्रातील आव्हाने आणि संधीबाबतच्या मांडणीचे उत्कृष्ट उदाहरण सादर करतो. महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर लगतच्या राज्यांमधील सौरऊर्जेच्या संभाव्य क्षमतेचा अंदाज हा नजीकच्या भविष्यासाठी ठोस नकारात्मक कल दर्शवतो. त्या अनुषंगाने तयारी अधिक चांगली असणे गरजेचे आहे. वातावरण बदलाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढय़ासाठी भारताने तीन ऑगस्टला ‘राष्ट्रीय निर्धारित योगदानांचा’ नवीन संच प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर हे अंदाज अधिक महत्त्वपूर्ण ठरतात.

अभ्यासात वर्तवलेल्या अंदाजांकडे भविष्यातील शक्यता म्हणून पाहावे लागेल. महाराष्ट्र आणि नजीकच्या प्रदेशातील अक्षय ऊर्जेच्या कार्यक्षमतेवर वातावरण बदलामुळे नक्कीच परिणाम होणार आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आणि त्यावर उपाय करण्याचे   महत्त्व  हा अभ्यास अधोरेखित करतो.

– पार्थसारथी मुखोपाध्याय, संशोधक

भविष्यातील सौर आणि पवन ऊर्जेची क्षमता दर्शवणारा हा अतिशय महत्त्वाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे. पण, आज भारताने सौर आणि पवन अशा अक्षय ऊर्जेची क्षमता वापरात आणण्याचे प्रयत्न पूर्णपणे केलेले नाहीत. हा अभ्यास भविष्यातील अंदाज मांडतो, त्यामुळे धोरण ठरवणे, व्यावसायिक निर्णय घेणे यासाठी हा अभ्यास उपयोगी पडू शकतो.

– डॉ. अंजल प्रकाश, संशोधन संचालक आणि सहायक सहयोगी प्राध्यापक, भारती इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक पॉलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस.