नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) देशात विशेषतः डेटा एन्ट्री, ग्राहक सेवा, टेलिमार्केटिंग आणि कनिष्ठ स्तरावरील आयटी क्षेत्रातील नोकऱ्या सर्वाधिक धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे तरुणाई चिंतेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात एआयमुळे भविष्यात काय होईल, यावर भाष्य केले.
एआयमुळे देशातील विविध क्षेत्राला आकार
नागपुरातील काटोल मार्गावरील रामदेवबाबा विद्यापीठात एआय लॅबच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री सत्यनारायण नुवाल, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पुरोहित, कुलगुरू आर. एस. पांडे, कैलाशचंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात एआयचे प्रमाण वाढत आहे. एआयमुळे देशातील विविध क्षेत्राला आकार मिळत आहे. उद्योग क्षेत्रातील क्रांतीसाठी एआय महत्त्वपूर्ण आहे. सध्या २०२६ मध्ये उद्योग क्षेत्रातील पाचवी क्रांती असून जगाला सहाव्या क्रांतीचीही चाहूल लागली आहे. यात शिक्षण क्षेत्राचा मोठा हिस्सा राहणार असून संशोधनासाठी एआयचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘एआय’मुळे बदलणार नोकऱ्यांचे स्वरुप
आज एआय जीवन बदलत आहे. काही दिवसांपूर्वी एका तज्ज्ञाने यावर चर्चा करताना पुढील एक हजार दिवसांत ७५ टक्के नोकऱ्यांमध्ये एआयमुळे बदल होणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यात नोकऱ्या जाणार नाही. एआयच्या प्रगतीमुळे नोकऱ्यांचे स्वरुप बदलणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले. रामदेवबाबा विद्यापीठात आज अत्याधुनिक एआय लॅब तयार करण्यात आला. आज शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण होत आहे. रामदेवबाबा संस्था ही खाजगी असून संस्थेने शिक्षणाला महत्त्व दिले. संशोधनावर अधिक भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल
डाटा हे नव्या जगाचे आईल आहे. एआयमुळे नवीन डाटा इंडस्ट्रिज तयार होणार असून मानवतेसाठीही उपयुक्त ठरणार आहे. जानेवारीमध्ये डावोस येथे स्वित्झरलँडच्या आरोग्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यांनी आयएमुळे आरोग्य क्षेत्रात एआयमुळे मोठी क्रांतीकारी बदल झाल्याचे सांगितले. तेथे २००० नंतर जन्म झालेले प्रत्येक मूल १०० वर्षे जगतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात एआयला प्राधान्य
आज कृषी क्षेत्रातही राज्य सरकार एआयला प्राधान्य देत आहे. यासाठी एक अॅप तयार केले. विविध भाषेत हे अॅप तयार करण्यात आले असून आदिवासी भाषेचाही त्यात समावेश आहे. शेतीतील रोपटे फुलावर आल्यानंतर त्याचा फोटो काढून अॅपमध्ये टाकल्यास पुढील पंधरा दिवसांचे तापमान, पुढे रोपटे वाढीसाठी काय करावे, हे शेतकऱ्यांना कळणार असल्याचे ते म्हणाले. एकूणच पिक वाढीचे पूर्ण चक्राबाबत माहिती मिळणार असून २५ ते ३० टक्के शेतीचे उत्पादन वाढेल, असा विश्वास त्यांनी केला.
