नागपूर : परस्परांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बैठकीत समोरासमोर आले. नरखेड ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जावाढीचा प्रश्न या भेटीचा केंद्रबिंदू ठरला.
राजकीय कटुतेनंतर पहिलीच भेट
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आरोप झाले होते. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर देशमुख यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणामागे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते शुक्रवारी नागपुरात एका बैठकीत एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
नरखेड रुग्णालयासाठी निवेदन
अनिल देशमुख यांनी ‘नरखेड उपजिल्हा रुग्णालय बचाव कृती समिती’चे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचा ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात दर्जावाढ करण्याचा निर्णय पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भातील सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. देशमुख यांनी सांगितले की, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्य सरकारने नरखेड ग्रामीण रुग्णालयाचा ३० खाटांवरून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात विस्तार करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, २९ मे २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे ही मंजुरी रद्द करण्यात आली.
ग्रामीण भागासाठी आरोग्यसेवा महत्त्वाची
नरखेड तालुक्यातील अनेक गावे तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर आहेत. काही भाग नागपूरपासून जवळपास १०० किलोमीटर दूर असल्याने नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णालयाचा विस्तार अत्यावश्यक असल्याचे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी असून त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम आरोग्यसेवा मिळण्याची संधी हिरावली गेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
साडेचार हजारांहून अधिक स्वाक्षऱ्यांचे समर्थन
रुग्णालयाच्या दर्जावाढीसाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला आहे. विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ४,९२८ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. रुग्णालयासाठी आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि वैद्यकीय पदांची भरती करून उन्नतीकरणाचा निर्णय तातडीने पुनर्स्थापित करावा, अशी मागणी कृती समितीने केली.
