नागपूर – अत्याधुनिक आणि तंत्रस्नेही स्वरूपाचे नवीन नागपूर वसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

काय आहे प्रकल्प

‘नवीन नागपूर’  हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  यांचाद्वारे संकल्पित करण्यात आला आहे. एनएमआरडीएच्या हद्दीत हे शहर होणार असून यात स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान कंपन्या व आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही या शहरातील मुख्य वैशिष्ट्य असेल. प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कूलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू व टेलिकॉम यांसारख्या सर्व मूलभूत नागरी सुविधा एकत्रितपणे पुरवेल. खोदकामविरहित व भविष्यातील गरजांना अनुकूल असे शहर साकारले जाईल. या प्रकल्पामुळे आयटी, वित्त व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, एकात्मिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक सुलभता व मजबूत प्रशासन मॉडेल यांच्या जोरावर हे शहर नागपूरच्या आर्थिक महत्त्वाला नव्याने परिभाषित करेल, अशी माहिती एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी दिली.

झिरो माईल्सचा विकास

 नागपूर शहराच्या आणि अखंड भारताच्या केंद्रस्थानी असलेले झिरो माईल स्टोन येथे सध्या पर्यटक येतात, तथापि तेथे त्यांनी थांबावे यासाठी या परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारित असून येथे अखंड भारत कसा होता ? त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी कसे आले याबाबचा इतिहास दर्शविणारे एक्सपिरियन्स सेंटर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एकूण ४५ कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालय, आवश्यक सोयी सुविधा आणि वाहन तळ तयार करण्यात येईल, तसेच भविष्यात महानगरपालिकेमार्फत याची देखभाल दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ऑरेंज स्ट्रीटवर परफॉर्मन्स गॅलरी

नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प येथे परफॉर्मन्स गॅलरी तयार करण्यात येणार आहे. येथे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. २० हजार चौ.मीटरच्या या जागेत ६.२ लाख चौ.फुट जागेच्या विकासाला परवानगी मिळाली असून यातील १.२ लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येईल, तसेच उर्वरित जागेत इतर सोयी सुविधा तयार करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर जाणार

नागपूर शहराचे कारागृह कामठी तालुक्यातील बाबुलखेडाजवळ ८१.६ एकर जागेत तयार करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी पालघर, तळोदा व दिल्ली येथे बांधलेल्या कारागृहाच्या आर्किटेक्टशी सल्लामसलत करुन जेल मॅन्युअलनुसार कार्यवाही करण्यात यावी, तसेच जेल सदनिका बांधण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बसस्थानक पुनरविकास

शहरातील मोरभवन आणि गणेशपेठ येथील बसस्टँडच्या पुनर्विकासाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मोरभवन येथे शहर बससेवा आणि खाजगी बस यांच्यासाठी तर गणेशपेठ येथे एसटी महामंडळाच्या बस आणि शहर बस यांच्यासाठी सुविधा निर्माण करुन पुनर्विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. याचबरोबर डिक दवाखाना, कॉटन मार्केट, दहीबाजार, इतवारी बाजार, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट आदी परिसरांचा विकास करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.