नागपूर : भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील त्यांच्या घटक पक्षांनी देशभरात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियान सुरू केले आहे. गुरुवारी नागपुरातही या अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमांग जोशी यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आले. या पदयात्रेपूर्वी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

नागपुरात पदयात्रेपूर्वी यशवंत स्टेडियम येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न राहूल गांधी व त्यांचे सहकारी करत आहे, असा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून संसदेत लढण्याचा अधिकार दिला आहे. परंतु कॉंग्रेस व त्यांचे सहकारी रस्त्यावर येत असेल तर आमचीही तयारी आहे. ४ कोटी बांगलादेशीची नावे मतदार यादीत होती. ती काढल्याने त्यांना मतदान करता येणार नाही, म्हणून पोटशूळ उठला आहे. त्यांच्या मतावर सत्ता मिळवायची आहे, जनमताची चोरी करायची आहे, संविधानाची चोरी करायची आहे. श्रीलंकेत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसारखी स्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु या देशाजवळ डॉ. बाबासाहेबांचे संविधान नव्हते. संविधानाशी खेळाल तर राहुल गांधी यांचे जळतील, असा इशारा फडण‌वीस यांनी दिला. लोकशाही संपवून अराजकता माजवत आहे, म्हणून भाजप व रालोआचे सर्व पक्ष मैदानात उतरले आहे. ही लढाई लोकशाही वाचविण्याची आहे, असे ते म्हणाले. 

देशात मोठ्या षडयंत्राचे प्रमुख राहुल गांधी 

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात षडयत्र सुरू आहे. त्यांना सत्तापरिवर्तनासोबत लोकशाहीच्या व्यवस्थेत तसेच संविधानात परिवर्तन करायचे आहे. देशात अतिडावी व्यवस्था निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. नेपाल, बांगालदेश, पाकिस्तान व श्रीलंकेत जे झाले, तेच देशात कायम करण्यासाठी षडयंत्र असून राहुल गांधी त्याचे प्रमुख आहे. कॉंग्रेसची भूमिका नेहमीच संविधानाच्या विरोधात राहिली आहे. संविधान हातात घेऊन संविधानाविरोधात कार्यक्रम सुरू आहे. कॉंग्रेसने सातत्याने हे काम केले. कॉंग्रेसने १९७५ मध्ये संविधान बदलण्याचे काम केले होते, असा आरोपही त्यांनी केला.

कॉंग्रेसकडून संविधानाची मोडतोड

फडणवीस म्हणाले, १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली. सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला. त्यामुळे इंदिरा गांधींना पंतप्रधान राहता येईल, पण संसदेत भाषण करता येणार नव्हते. कॉंग्रेसने पाशवी बहुमताच्या आधारावर संविधानात संशोधन केले. त्यात पंतप्रधान कुठल्याही न्यायालयाच्या अधीनस्थ राहणार नाही, असा बदल करून इंदिरा गांधी यांना पदावर स्थापित केले आणि संविधनाचा गळा कापला. मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान न्यायालयाच्या अधीन राहील, असे संशोेधन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार कायम ठेवले, असे फडणवीस म्हणाले.