नागपूर : अल निनोमुळे पाऊस लांबणीवर पडलाच, शिवाय राज्यात सरासरीपेक्षा बऱ्याच भागात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. परंतु अल निनोचे संकट तीव्र राहणार आहे. ते कधीपर्यंत राहणार, त्यावर राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जातील, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
नागपुरात रामगिरी येथे रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल निनोच्या संकटावरही चर्चा केली. त्यांनी अल निनो आणखी तीव्र होणार असल्याचे नमुद केले. अल निनोची तीव्रता फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार असून त्यानंतर ती कमी होईल. त्यामुळे राज्य सरकारकडून सर्वप्रकारची तयारी केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. जुलै २०२७ पर्यंत पुरेल एवढ्या पाण्याची सोय केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात उपलब्धतेनुसार त्याच भागातील कमी पाणी असलेल्या भागात जास्त पाणी असलेल्या भागातील पाणी पोहोचविले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ घोषित न केलेल्या तालुक्यांनाही मदत करणार
दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. त्यासाठी पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. काही ठिकाणाहून त्यांच्या तालुक्याता दुष्काळात समावेश न केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तालुक्यातही पाहणी केली जाणार असून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळासाठी काही खर्च कमी केले जातील, असे संकेतही त्यांनी दिले. काही खर्चाला हात लावता येणार नाही. परंतु शक्य तिथे खर्च कमी करून तसेच इतरही पर्याय शोधून दुष्काळग्रस्तांना मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
राहूल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला
राहूल गांधी हातात संविधान घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत. जनतेचा कॉंग्रेसवरील विश्वास उडाला असून तो मिळविण्यासाठी त्यांचा केविलपणा प्रयत्न आहे. सर्व संवैधानिक संस्थांचे महत्त्व अबाधित आहे. ते पराभूत झाले की ईव्हीएमला दोष देत होते. आता थेट निवडणूक आयुक्तांनाच घेरण्याची रणनिती त्यांनी केली आहे. मतदान चोरी नव्हे तर विरोधी पक्षनेत्याचा मेंदूच चोरीला गेला असून पंतप्रधानांना एखादी समिती गठीत करून तो शोधावा, अशी मागणी करणार असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.
