अकोला : शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर महिलांना मासिक पाळीच्या काळातील अडचणींवर मात देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आनंदी कक्ष’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या कक्षाचे लोकार्पण झाले. हा वैशिष्टपूर्ण कक्ष लक्षवेधी ठरत आहे.मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात स्त्रियांना काही शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवू शकतात. मासिक पाळीच्या काळात थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता राखणे आवश्यक असते.
मासिक पाळीच्या काळात स्त्रिया बाहेर असल्यास त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय कार्यालयातील महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यावर उपययोजना करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन व अत्याधुनिक इमारतीत ‘आनंदी कक्ष’ या विशेष सुविधेची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय आणि क्षितिज बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या ‘आनंदी कक्ष’ उपक्रमाची मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेतली. हा उपक्रम आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मासिक पाळीच्या क्षेत्रात क्षितिज संस्था गत १० वर्षांपासून कार्य करते. ‘आनंदी कक्ष’ मध्ये महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान लागणाऱ्या सर्व सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘सॅनिटरी नॅपकिन’ यंत्र, पॅड जाळण्याचे यंत्र, विश्रांतीसाठी आराम खुर्ची, स्वच्छ व सुरक्षित वातावरण हे कक्षाचे वैशिष्ट्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
‘आनंदी कक्ष’ हे स्त्री सन्मान व आरोग्याच्या दृष्टीने प्रेरणादायी
आजही मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या अडचणींमुळे अनेक महिला व विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयीन कामांपासून दूर राहतात. या परिस्थितीत ‘आनंदी कक्ष’ हे स्त्री सन्मान व आरोग्याच्या दृष्टीने एक प्रेरणादायी, विधायक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक पाऊल ठरेल, असे मत क्षितिज संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहल चौधरी कदम यांनी व्यक्त केले. अतुल राऊत, सौरभ साठवणे, कल्याणी किल्लेदार, इशिता गावंडे, वैष्णवी डिवरे, अंकिता गुडजी, आर्या घाणफोड, निसर्गा मेश्राम, डॉ. सोनल कामे, डॉ. स्वाती फुलमाळी यांनी विशेष योगदान दिले.