नागपूर : भारत कृषी प्रधान देश समजल्या जातो. शेती करणाऱ्याचे प्रमाण जास्त होते. परंतु आता शेती हा तोट्याचा व्यवसाय समजल्या जातो. नापिकी, कमी उत्पादन व अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेकांनी शेतीपासून फारकत घेतली आहे. शेतीचीही उत्पादकता कमी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी देशी गायीला जबाबदार ठरवले आहे.

नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप झाला. पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्यावतीने या संवाद यात्रेच आयोजन करण्यात आले होते. गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी २२ जूनला यात्रेची सुरुवात झाली. एक हजारहून अधिक गोशाळांनी यात सहभाग नोंदवला. १५ हजार गोशाळा संचालक, गोसेवक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. २९ जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास झाला. या समारोपीय कार्यक्रमात गृह राज्यमंत्री पंकज भोयर, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार माया इवनाते, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त किरण पाटील, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

भारत देश हा कृषी संस्कृतीचा होता. देश संपन्न होता. दूध,दही भरपूर प्रमाणात होते. हे समृद्धीचे प्रतीक आहे. या कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी गोमाता होती. गोमातेपासून दूध,दही, शेण, गोमुत्र अशा बहुपयोगी वस्तू शेतकऱ्यांना मिळत होत्या. आपली देशी गाय जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त देत असते. तीला चारा, पाणी कमी लागते. प्रदूषणही कमी करणारी देशी गाय आहे. या देशी गायीमुळे शेतकरी समृद्ध होता. परंतु तीचे महत्त्व कमी होत गेले. परिणामी शेती रसातळाला गेली आणि शेतकरीही देशोधडीला लागला, असे ते म्हणाले.

हेही वाचा

रासायनिक खत आणि जनुकीय बियाणांचा वापर वाढला आहे. प्रथम यामुळे फायदा झाला. परंतु आता जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. त्यामुळे आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळावे लागणार आहे. नैसर्गिक शेतीचा केंद्र बिंदू गोमाताच आहे. नैसर्गिक शेतीपासून उत्पादकता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोधनमुळे आत्महत्या कमी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २००६-०७ मध्ये शेतकरी आत्महत्या संदर्भात एक अहवाल आला. त्यात ज्या शेतकऱ्यांकडे गोधन आहे, त्यांनी आत्महत्येचा विचार केला नाही. तर ज्यांच्याकडे गोमाता नव्हती त्यांनी आत्महत्येचा विचार केला. गोमातीही आधार देणारी आहे. अनेक देशांनी भारतीय गायी नेल्या. तिथे आता दूधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले. गोशाळा या गोशक्तीचे केंद्र झाले पाहिजे, असे ते म्हणाले.