नागपूर : मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मुंबईच्या बाहेरून आलेल्यांना मुंबईचे प्रश्न कसे काय समजणार, असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्यावर निशाना साधला. मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या प्रश्नाची जाण नाही, त्यामुळे त्यांना वेदना कळणार नाही, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी डिवचल्यामुळे दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात एका मुलाखतीतून मला मुंबई बाहेरचे ठरवले गेल्याने मी आज सर्टिफाईड नागपूरकर आहे, असे नमुद केले. नागपुरात ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या मुलाखतीतून फडणवीस यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास व त्यातील बहारदार किस्सेही सांगितले.

सिव्हिल लाईन येथील स्वागत लॉनमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेते भारत गणेशपुरे यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राजकीय कारकिर्दीतील किस्से, आरोपांवर संयमाने बोलणे आदीवर भाष्य करताना विरोधकांनाही टोले लावले. नागपुरातील संस्कृती वेगळीच आहे. आजही आम्ही येथे प्लॉट क्रमांकाने नव्हे तर नावाने घरे ओळखली जाते. आज एका मुलाखतीत मला मुंबई बाहेरचे ठरवले. मी आज सर्टिफाईड नागपूरकर आहे, असा टोला फडणवीस यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच लावला. मुंबईत जन्म घेऊनही मुंबईचा विकास करू शकले नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लावला. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्याकडे दाखवायला आणि सांगायला काहीच नाही. उद्धव ठाकरे यांची २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता होती. त्यांनी काहीच केले नाही. उद्धव ठाकरेंना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. टाेमणे मारणे आणि टीकेवर जनता मतदान करत नाही. केवळ विकासावरच मतदान करणार असून २९ पैकी २७ महापालिकांमध्ये भाजप विजयी होणार आहे. अन्य ठिकाणी आमच्याच मित्रपक्षाचा महापौर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गोपीनाथ मुंडेमुळे ओबीसी नेता झालो

ओबीसींना आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअरमध्ये १ लाख रुपयांच्या उत्पन्नाची अट होती. याचा अभ्यास केला. समिती गठित झाली. अहवाल तयार करून विधानसभेत मांडला. त्यानंतर ही मर्यादा अडीच लाख झाली. आता मी ती आठ लाखांपर्यंत केली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शुल्क संदर्भात आंदोलनात भाग घेतला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनामुळे लाभ झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिले ओबीसी मंत्रालय तयार केले. वसतिगृह तयार केले, महाज्योतीच्या माध्यमातून विविध योजना आणल्या, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहरातील मेट्रोचा विस्तार, २४ तास पाणी, सांडपाण्यावर प्रक्रिया, कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस निर्मिती, नाग नदी प्रकल्प, नवीन नागपूर, यातील व्यावसायिक शहराची निर्मितीची योजना, नवीन बाह्य वळण मार्ग, समृद्धी महामार्ग, पुढील काळात २५ हजार झोपडपट्टीधारकांना पट्टे आदी प्रकल्पावर विविध प्रश्नातून प्रकाश टाकला. 

नगरसेवकांनी स्वत:ला मालक समजू नये

नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला देतांना मुख्यमंत्री म्हणाले, अलिकडच्या काळात नगरसेवक त्यांच्या भागाचा मालक असल्यासारखे वागतात. ते चुकीचे आहे. त्यांनी सेवेची भावना ठेवायला हवी. यावेळी त्यांनी मागील जन्मात पाप केले ते नगरसेवक होतात अन महापाप केले ते महापौर होतात, असे नमुद करताच हशा पिकला. महापौर झाल्यानंतर पहिल्याच सकाळी परिसरातील एक नागरिक सिवेज लाईनचे चेंबर तुंबल्याची तक्रार घेऊन आल्याचे सांगितले. अजूनही काही लोक केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याकडे सिवेज लाईनची तक्रार घेऊन येत असल्याचे नमुद करीत त्यांनी नागरिकांनीही नागरी समस्या कुणाला सांगाव्या, याबाबत प्रशिक्षित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नागपूरचे विचार देशभरात

नागपुरात विचार तयार होतात. ते देशभरात जातात. हे शहर विचाराची राजधानी असून आर्थिक राजधानी एकच पुरे आहे, असे नमुद करीत मुंबईबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली. पंतप्रधानपदाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सध्या या पदासाठी रिक्त जागा नाही. २०२९ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.