नागपूर : भारतीय जनता पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याने दोन्ही पक्षातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली व त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले.

एकूणच सध्या तरी भाजप-शिंदे सेना यांच्यातील राजकीय मतभेद टोकाला गेल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शिंदे सेनेने थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. जिल्ह्यातील २७ पालिका आणि नगरपंचायतीच्या शहरात १३ ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी लढत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू राज्यमंत्री आशीष जयस्वाल हेच सेनेच्या मोहिमेचे नेतृत्व करीत असल्याने लढत रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

नगरपंचायतआणि नगर पालिका निवडणुकीसाठी अर्जदाखल करण्याची शेवटची तारीख शुक्रवारी होती .त्यानंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. १५ पालिका आणि १२ नगर पंचायती अशा एकूण २७ शहरात निवडणुका आहेत. यापैकी १३् ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे) यांच्यात लढत आहे.

भाजपने सुरूवातीपासूनच युतीबाबत भूमिका स्पष्ट केली नाही, कधी महायुती एकत्र लढणार असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणत होते तर कधी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा बोलत होते. शेवटपर्यत भाजपने शिवसेनेला दाद दिली नही, त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करून काही ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात ७ ठिकाणी निवडणूक लढवत आहे. कधीकाळी एकसंध शिवसेनेचा गड मानला जाणारे रामटेकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार नाही. तेथे शिंदे सेनेने भाजप विरोधात उमेदवार दिला आहे.