नागपूर : राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. काहीकंडून याचे समर्थन होत असून काहींकडून याचा विरोध होत आहे. समर्थक व विरोधकांकडून आंदोलनेही करण्यात येत आहे. हे उपवर्गीकरण संवैधानिक नसल्याचाही आरोप होत आहे. तर न्या. अनंत बदर समितीचा अहवाल प्रसिद्ध न करताच सूचना व आक्षेप मागवण्यात येत असल्यानेही टीका होत आहे.
उपवर्गीकरण कोणत्या प्रकारे करण्यात आले, अ,ब,क,ड मध्ये कोणत्या जातीचा समावेश करण्यात आला असून कोणत्या गटाला किती आरक्षण देण्यात आले, अशी विचारणाही होत आहे. दरम्यान बदर समितीच्या अहवालावर सूचना व आक्षेप घेण्यासाठी देण्यात आलेली मुदत ३० एप्रिलला संपली. यावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
नागपुरात त्यांनी आज विविध शासकीय बांधकामांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत आहे. सरकारने यावर न्या. बदर समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल सादर झाला आहे. काहींनी यावर सूचना व हरकत घेण्याची भाषा केली. त्यामुळे त्यावर सूचना व आक्षेप मागवण्यात आले आहे. ते सर्व ऐकूण घेण्यात येणार आहे. या उपवर्गीकरणासंदर्भात काही दिशानिर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यादिशानिर्देशानुसारच निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनत बोलण्याचा अधिकार फक्त शिंदेंना
पुढील निवडणुका भाजप, शिवसेना वेगवेगळ्या लढतील, असे वक्तव्य शिवसनेच्या मंत्र्यांकडून देण्यात येत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, शिवसनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना आहे. त्यांनी वक्तव्य केल्यावरच माल विचारा, नाही तर प्रवक्त्यांना विचारा, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची किव करावीशी वाटते
अनेक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला माघार घ्यावी लागली, यावर बोलतना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील परिस्थिती ही अतिशय नाजूक आहे. तो त्यांचा पक्ष आहे. त्यासंदर्भात त्यांनीच कारवाई करावी. पण एक बाहेरचा व्यक्ती म्हणून मी पाहतो, त्यावेळी इतक्या जुन्या पक्षाची अवस्था पाहूण निश्चितपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची किव करावी, अशीच परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
शासकीय कामात त्रुटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काम चागंले होत आहे. परंतु कामात काही त्रुटी आहेत. त्या अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आल्या. त्या त्रुटी पूर्ण करून रुग्णांना दर्जेदार चिकित्सा मिळाली पाहिजे. महाविद्यालयाचे बांधकाम चांगलेच झाले पाहिजे, असा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सरकारी रुग्णालयात चांगले डॉक्टर
महात्मा फुले जनआरोग्य योजना शासकीय रुग्णालयातही सुरू करण्यात आली आहे. यावर फडणवीस म्हणाले की, आम्ही अतिशय उचित निर्णय घेतला की महात्मा फुले योजना हे आमच्या सरकारी रुग्णालयांनाही लागू केली. कारण सरकारी रुग्णालयात चांगले डॉक्टर्स आणि व्यवस्था आहे. हे लागू केल्यामुळे त्यांनाही दोन पैसे मिळतात. त्यातील काही पैशांचा खर्चासाठी वापर होतो. खासगी लोकांच्या भरोशावर योजना चालवणे योग्य नाही, असे ही ते म्हणाले.
