नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भाजपची मातृसंघटना आहे. आरएसएसच्या निर्देशानुसारच भाजप कार्य करीत असल्याची टीका अनेकदा झाली आहे. यापूर्वी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बामसेफच्या कार्यक्रमास आरएसएसच्या इशाऱ्यावरून परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप करीत नागपुरात संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
आता कॉंग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून आरएसएसच्या मुख्यमालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.एपस्टिन फाइलवरून ते मोर्चा काढणार आहे. एपस्टिन फाइलवर स्पष्टीकरण देत संबंधितांवर कारवाईचीही मागणी आहे. सोमवारला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. तर या मोर्चावर सत्ताधाऱ्यांचेही लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, लोकशाहीत कुणालाही कुणाविरोधात मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परंतु ते कशासाठी मोर्चा काढत आहे, हे त्यांनाच माहीत नसल्याची टीका फडणवीस यांनी केली.
त्यांच्याकडे कुठलेच पुरावे नाही
वंचित बहुजन आघाडी व कॉंग्रेसतर्फे सोमवारला नागपुरात आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही पक्षाकडून तयारी सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश ही उपस्थित राहणार आहे. या मोर्चामुळे प्रशासनाची धावपळ उडण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस या संदर्भात निर्णय घेतील.
कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, हे काम पोलीस बघतील. लोकशाहीत कुणालाही कुणा विरोधात मोर्चा काढता येते. परंतु मोर्चा कशासाठी काढतोय हेच त्यांना माहिती नाही. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. कुठलीही कल्पना त्यांना नाही. फक्त माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याच्या अनुषंगावर ते मागणी करीत असून माध्यमामंध्ये राहण्यासाठी ते मोर्चा काढत असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली.
राहुल गांधी देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात
इराण व इस्त्रायल- अमेरिका युद्धामुळे महागाई वाढेल, असा इशारा कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, युद्ध होत असताना सामान्य नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने घेतली आहे. शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये पेट्रोल, डिझेल महागले आहे. तिथे शाळा बंद करून घरून काम करण्यास सांगण्यात येत आहे. परंतु आपल्या देशात तसे नाही. राहुल गांधी देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोकांनी त्यांनी नाकारल्याचे ते म्हणाले.
