scorecardresearch

“दाऊद, ईडीचे ९ छापे, पॉवर ऑफ अटर्नी आणि टेरर फंडिंग”, मलिकांच्या ईडी कोठडीनंतर फडणवीसांचे गंभीर आरोप

भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी दिल्यानंतर दाऊद आणि टेरर फंडिंगबाबत गंभीर आरोप केले आहेत.

Devendra Fadnavis on Nawab Malik 2
देवेंद्र फडणवीस (संग्रहीत छायाचित्र)

भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी दिल्यानंतर दाऊद आणि टेरर फंडिंगबाबत गंभीर आरोप केले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या जमिनीच्या मूळ मालकांना एकही पैसा मिळालेला नाही. बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार करून दाऊदला त्याची बहिण हसिना पारकरच्या माध्यमातून ५५ लाख रुपये पाठवण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच या प्रकरणी ईडीने ९ छापे टाकल्यानंतर काही लिंक्स समोर आल्या. त्यातील एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुळातच हा संपूर्ण प्रकार फार गंभीर आहे. एनआयए आणि ईडीने मध्यंतरीच्या काळात काही कारवाई केल्या. त्यात त्यांना दाऊद कशाप्रकारे भारतात रिअल इस्टेटच्या माध्यमातून दहशतवाद निधी (टेरर फंडिंग) उभा करतो आहे. हे व्यवहार मनी लाँडरिंगच्या माध्यमातून होत आहेत. या प्रकरणात जवळपास ९ ठिकाणी ईडीने छापे टाकले आणि त्यातून अनेक लिंक्स बाहेर आल्या आहेत. त्यातीलच एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. हे सर्व आज ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे.

“जमिनीच्या मालकांना एकही पैसा मिळालेला नाही”

“मंत्री नवाब मलिक यांनी जी जमीन घेतली ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि सरदार पटेल जो हसिना पारकरचा उजवा हात आणि चालक आहे. दाऊदच्या या संपत्तीच्या व्यवहारात हसिना पारकर त्याला फ्रंट मॅन म्हणून वापरत होती. त्यांच्याकडून मलिकांनी ही जमीन घेतली. जमिनीच्या मालकांनी ईडीला सांगितलं की आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यांना केवळ अतिक्रमण काढण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी द्या असं सांगण्यात आलं. ती पॉवर ऑफ अटर्नी संपूर्ण बदलवून हा सर्व व्यवहार करण्यात आला,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“सगळी जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “जे २५ लाख रुपये जमीन मालकांना दिल्याचं दाखवलं जातंय. तेही त्यांना मिळालेले नाहीत. त्यांना एकही पैसा मिळाला नाही. हसिना पारकर ज्या ठिकाणी येऊन हा व्यवहार करत होती तेथील लोकांनी जबाब दिलाय. या व्यवहारात हसिना पारकरला ५५ लाख रुपये देण्यात आले. त्याचेही पुरावे ईडीला मिळाले आहेत. या व्यवहारात सगळी जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. त्याचवेळी हे सर्व पैसे अंडरवर्ल्डला गेले. ही हजारो कोटी रुपयाची जमीन घेऊन ते पैसे हसिना पारकरला म्हणजे दाऊदला थेट मिळाले.”

हेही वाचा : Nawab Malik Arrest : “मला अटक झालीय, पण…”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया

“हा व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीनवेळा हल्ले, बॉम्बस्फोट”

“एखाद्या मंत्र्याने मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन विकत घेण्याचं कारण काय? ती जमीन त्याची नसताना विकत घेण्याचं कारण काय? हसिना पारकरशी व्यवहार करण्याचं कारण काय? हा व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीनवेळा हल्ले, बॉम्बस्फोट झालेत. जे लोक मुंबईत स्फोट करतात त्यांना आपल्या व्यवहारातून पैसे देणार असू तर हे अतिशय निंदनीय आहे,” असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis serious allegations on nawab malik after ed custody till 3 march pbs

ताज्या बातम्या