नागपूर : शिवसेनेच्या मेळाव्यात ना विचार होता, ना सोने होते. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून नैराश्य आणि त्यांची हतबलता दिसत होती. ते प्रत्येक भाषणात सरकार पाडून दाखवा म्हणतात. पण ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी कळणारही नाही. जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादीला नाकारले आणि शिवसेनेला काठावर पास केले आहे. जनतेसोबत बेइमानी करून हे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी आता भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे, असा उपरोधिक सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा होती ती ठाकरे यांनी पूर्ण केली. आता ते त्याला तत्त्वज्ञानाची जोड देत आहेत. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यात बंगाल प्रारूप राबवणार असल्याची घोषणा केली. मात्र आम्ही महाराष्ट्राचा कधीच बंगाल होऊ  देणार नाही.

युनियनबाजी आणि खंडणीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. संघराज्य व्यवस्थेवर उद्धव ठाकरे यांनी  प्रश्नचिन्ह उपस्थित करत संविधान बदलण्याचे मनसुबेच त्यांनी बोलून दाखवले. काही झाले तरी संविधान बदलू देणार नाही असेही फडणवीस म्हणाले. 

..तर अर्धे मंत्रिमंडळ कारागृहात!

महाराष्ट्रात सर्वात भ्रष्ट सरकार आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयची कारवाई सुरू आहे. दलाली सुरू असताना मुख्यमंत्र्यांना झोप लागायला नको पण, काही मंत्र्यांनी तर वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. अशा पद्धतीने काम चालत असेल तर ईडी, सीबीआय येणार, ज्याने काही केले त्यांना भय असेल. एजन्सीचा गैरवापर पंतप्रधान मोदी करत नाहीत अन्यथा आघाडीचे अर्धे मंत्रिमंडळ कारागृहात असते, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

मलिक यांचे प्रत्युत्तर

अर्धे काय, पूर्ण मंत्रीमंडळाला तुरुंगात टाका. आम्ही कुणाला घाबरत नाही, असे प्रतीउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.