नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर हल्लाबोल करीत राजीनाम्याची मागणी केली. निवडणुकांमधील गैरप्रकार, मतचोरी, कायद्याचे उल्लंघन, संस्थात्मक चोरी असे गंभीर आरोप त्यांनी केले आहे. सत्ताविरोधी लाटे चा भाजपवर परिणाम का होत नाही? असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला चढवित त्यांचा मेंदूच चोरीला गेल्याचा घणाघात केला.
नागपुरात रामगिरी येथे रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी राहूल गांधी यांच्यावर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राहूल गांधी हातात संविधान घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत. जनतेचा कॉंग्रेसवरील विश्वास उडाला असून तो मिळविण्यासाठी त्यांचा केविलपणा प्रयत्न आहे. सर्व संवैधानिक संस्थांचे महत्त्व अबाधित आहे. ते पराभूत झाले की ईव्हीएमला दोष देत होते. आता थेट निवडणूक आयुक्तांनाच घेरण्याची रणनिती त्यांनी केली आहे. मतदान चोरी नव्हे तर विरोधी पक्षनेत्याचा मेंदूच चोरीला गेला असून पंतप्रधानांना एखादी समिती गठीत करून तो शोधावा, अशी मागणी करणार असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.
पटवून देणे अशक्य झाल्याने लोकांना संभ्रमित करण्याचे काम
राहूल गांधी यांना काहीही सिद्ध करता आले नाही. उलट त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चीनच्या सिमेवर तैनात जवान चीनकडून मार खात असल्याचे विधान करून जवानांचा अपमान केला. ते सतत खोटे बोलतात आणि नंतर न्यायालयात माफी मागतात. निवडणूक आयोगामध्ये तिन्ही आयुक्तांत कुठलाही वाद नाही. सर्व निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी संयुक्तपणे सांगितले आहे. मुळात राहूल गांधी आपला मुद्दा जनतेला पटवून देऊ शकत नाही, त्यामुळे ते जनतेला संभ्रमित करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ज्या क्षेत्रात एसआयआरच्या माध्यमातून मतदार कमी झाले, अशा १५ ठिकाणी तृणमूल कॉंग्रेस विजयी झाली. एसआयआरमध्ये प्रत्येक पक्षाला संधी आहे, असेही ते म्हणाले.
देशात अराजकता निर्माण करण्याचे काम
राहूल गांधी यांना संवैधानिक संस्थांना बदनाम करून त्यावरील विश्वासाला सुरुंग लावून अराजकता तयार करण्याते काम करीत आहे. अराजकता निर्माण करून डाव्या विचारसरणींना ते सत्तेत आणू पाहत आहे. परंतु त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. सध्या इंडिया आघाडी राहीली नाही. लोकसभेनंतर सर्व वेगवेगळे झाले आहेत. मोंदींना विरोध करणारे लोक, एवढीच त्यांची ओळख राहीली, अशी टिकाही त्यांनी केली.
