नागपूर: सामाजिक आणि आर्थिकबाबतीत महत्त्वाचा देश ठरेल, अशी १७ एप्रिलला अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होते. सर्वजण मदत करतील, अशी अपेक्षा होती. मात्र डीएमके, एनसीपी (शप), समाजवादी, शिवसेना उबाठा , काँग्रेस यांनी महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन केले, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राहुल गांधींना महिला विषयावर आता बोलण्याचा अधिकार नाही. भारतात पहिल्यांदा महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळत होती. मात्र काँग्रेस असा पक्ष आहे, ज्यांनी संख्याबळाच्या भरोशावर प्रतिगामी निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपूरमध्ये त्यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये एलआयटी हे खूप मोठे नाव आहे. आठ दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्य सुरू आहे. जगातील टॉप मोस्ट इंजिनियर हे एलआयटीमधून घडले. मात्र इन्फ्रास्ट्रक्चर आणि काही कारणांमुळे दर्जा खाली गेला होता. त्यामुळे स्वायत्तता दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलआयटीचा दर्जा आता वाढत आहे. आंतरराष्ट्रीय संकुल या ठिकाणी निर्माण होत आहे. मागील आठ दशकात बेस्ट ऑफ इंजिनियर जगभरात दिले, भविष्यातही जगाला उत्तम इंजिनिअर देण्याचे काम होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
धामणगावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन
भिवापूर तालुक्यातील धामणगावात दुर्दैवी घटना घडली. प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाले असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर वादळी वाऱ्यामुळे आग पसरली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. काही जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने उत्तम मदतकार्य केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः लक्ष ठेऊन होते. ते स्वतः त्या ठिकाणी भेट देणार आहे. तेथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू
लोकसभेत ५४३ जागा असतील, असे १९७१ साली ठरले होते. तेव्हा लोकसंख्या ४५ कोटी होती आणि आता १४० कोटी लोकसंख्या आहे. पिपल्स रिप्रेजेंटेशन ॲक्टबरोबर प्रतारणा होईल. उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न या विधेयकात केले होते. लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. नेहमीच काँग्रेस आणि साथीदारांची अशी प्रवृत्ती राहिली आहे. त्यांनी सातत्याने महिला विरोधी धोरण अवलंबले, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
