९६वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे सुरू आहे. आज या साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साहित्य संमेलनाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी विदर्भ साहित्य संघाला राज्य सरकारतर्फे १० कोटी रुपये देणगी देण्याची घोषणा केली. तसेच राजकीय नेते ही साहित्यिकांची प्रेरणा असतात, असं मिश्किल विधानही त्यांनी यावेळी केलं. यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

माझ्यासह अनेक लोकांना प्रश्न पडतो, की साहित्याच्या व्यासपीठावर राजकीय नेते काय करतात? हा प्रश्न योग्यही आहे. याबाबत मला असं वाटतं की राजकीय नेते अनेक साहित्यिकांची प्रेरणा असतात. कारण आम्ही नसलो, तर व्यंगचित्र काढणाऱ्यांना कामच उरणार नाहीत. आमच्यात शीघ्रकवी आहेत, आमच्या यमक जुळवणारे कवी आहेत, आमच्यामध्ये स्क्रिप्ट लिहीणारे लोकं आहेत, आमच्यात स्टोरी तयार करणारे लोकं आहेत. तुम्ही सकाळी ९ वाजता टीव्ही लावला, की आमच्यातील साहित्य ओसांडून वाहताना पाहू शकता. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अतिशय पवित्र मंचावर आम्हाला थोडीशी जागा मिळते, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच आम्ही इतके हूशार आहोत, की थोडीशी जागा मिळाली की व्यापून कशी टाकायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे, अशी मिश्किल टीप्पणीही त्यांनी केली.

मराठी भाषेने आपलं एक वेगळेपण जपलंय

आज आपल्या मराठी भाषेत गुराखी, झाडीपट्टी, विद्रोही, दलित, अशी विविध साहित्य संमेलन होत असतात. पण ही सर्व साहित्य संमेलनं आपल्या विचारांना आणि अभिव्यक्तीला समृद्ध करतात त्यामुळे मराठीतली साहित्य संमेलनाची जी परंपरा आहे. ती परंपरा अतिशय मोलाची आहे. इतर भाषेत इतकी साहित्य संमेलनं होताना दिसत नाहीत. मराठी भाषेने आपलं एक वेगळेपण जपलं आहे, असेही ते म्हणाले.

मराठीबाबत भविष्यातील चिंता दूर होतील

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठी भाषेबाबत ज्या चिंता व्यक्त केल्या आहेत, त्या योग्य आहेत. गेल्या काही वर्षात आपल्या भाषेचा जो ऱ्हास झाला आहे. त्याचं ऐकमेव कारण म्हणजे आपण आपल्या भाषेला ज्ञानभाषा करू शकलो नाही. आपला सर्व अभ्यासक्रम हा इंग्रजीत होता. त्यामुळे १०व्या वर्गानंतर मुलांचा मराठीकडचा ओढा कमी झाला. मात्र, पंतप्रधान मोदींनी जे नवीन शिक्षण धोरण आणले आहे, त्या धोरणामध्ये सर्व प्रकारचं शिक्षण मराठी देता येणार आहे. त्यामुळे मराठीबाबत भविष्यातील ज्या चिंता आहेत, त्या दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी दीपक केसरकरांचे शरद पवारांना आवाहन, म्हणाले “पवारसाहेब सर्वांचेच…”

विदर्भ साहित्य संघाला आम्ही १० कोटी देणगी

यंदा विदर्भ साहित्य संमेलनाला १०० वर्ष पूर्ण होत आहे. विदर्भ साहित्य संघ अनेक लोकांच्या मेहनतीतून उभा राहिला आहे. अनेक अडचणींचा सामना त्यांनी केला. त्यामुळे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाला आम्ही १० कोटी रुपये देणगी स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis speech in wardha akhil bhartiya sahitya sammelan spb
First published on: 05-02-2023 at 14:20 IST