वर्धा : ही देशाची निवडणूक असून देशाचा नेता निवडायचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकासाची गाडी सुसाट निघाली आहे. ‘असली पिक्चर अभी बाकी है.’ आता पुढील कार्यकाळात देशाला शक्तीमान, कणखर, मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे. आमची एकाच इंजिनाची गाडी तर विरोधकांची डब्बे नसलेली व केवळ इंजिनेच असलेली गाडी आहे. त्यात सामान्यांना जागा नाही. म्हणून भरघोस मतदान करीत रामदास तडस यांची बोगी मोदींच्या इंजिनाला जोडा, कारण मोदींचे नेतृत्व म्हणजे यशाची गुरूकिल्ली होय, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या आज अखेरच्या दिवशी अगदी शेवटच्या तासात धावपळ करीत पोहचलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा सत्ता देण्यासाठी जोरदार आवाहन केले. चांदुर रेल्वे, पुलगाव, यवतमाळ, असा दौरा आटोपून फडणवीस हे ५ वाजून ४० मिनिटांनी व्यासपीठावर पोहचले. पोहोचताच त्यांनी थेट माईक हातात घेत भाषणाला सुरुवात केली.

हेही वाचा…“काँग्रेसच्या घोषणेने गरिबी तर हटली नाही, गरीब आणखी गरीब झाले,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका; म्हणाले…

आम्ही म्हणतो देशाच्या संसाधनावर पहिला हक्क गरिबांचा तर ते म्हणतात पहिला हक्क अल्पसंख्यकांचा असणार. तुमच्या मृत्यूपश्चात तुमची ५५ टक्के संपत्ती सरकार जमा करून इतरांना वाटणार. मात्र आम्ही असे होवू देणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना शेतमालाचे भाव पडले. तेव्हा आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याकडे शिष्टमंडळ नेत शेतकऱ्यांना मदतीचे साकडे घातले. पंतप्रधानांनी मदत मंजूर केली, अशी आठवण फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

हेही वाचा…“भाजपमुळे भ्रमनिरास झाल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली,” ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले, ‘‘संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच…”

देशाच्या संविधानाला धक्का लागणार नाही, अशी खात्री आम्ही देतो. देशातील पारंपारिक व्यवसायिक असो की अन्य दुर्बल घटक असो, प्रत्येकाला केंद्र शासनाने मदत दिली आहे. भविष्यातील सक्षम भारतात घडविण्यासाठी कमळालाच मतदान करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. या सभेत रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे, विजय आगलावे आदींची भाषणे झाली.