बुलढाणा: मुंबई नजिकच्या अरबी समुद्रातील दीर्घ काळ कागदोपत्रीच रखडलेल्या शिव स्मारक संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाही तीव्र निषेध करावा असा टोला महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मागील तीन ऑक्टोबर २०२४ रोजी खामगाव तालुक्यातील घाटपुरी जगदंबा संस्थान येथे धावता दौरा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या पाठोपाठ आज रविवारी, सहा ऑक्टोबर रोजी त्यांचे सहकारी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खामगाव शहरात दाखल झाले. सकाळी खामगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फोजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर खामगाव येथीलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे आयोजित समारंभात त्यांनी कोट्यवधी रुपये किंमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण नामदार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या व्यस्त कार्यक्रम दरम्यान त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत धावता संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी महाराज यांना हा खोचक सल्ला देत पलटवार केला.
कोर्टात जाणारे काँग्रेसचे वकील
छत्रपती संभाजी राजे रविवारी समुद्रात शिवस्मारक शोधायला निघाले आहे या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी राजे यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवस्मारक समुद्रात झाले पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. संभाजी महाराजानी भाजपचा निषेध केलाय. मात्र या स्मारकाच्या विरोधात न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कोणाचे वकील आहे, ते काँग्रेसचे अधिकृत प्रचारक आहेत हे देखील संभाजी राजेंनी बघितलं पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रचार करणारे वकील हे ‘कोर्टात’ जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये, म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावं असा सवाल उपस्थित करून अशा वकिलाचा देखील संभाजी राजांनी निषेध केला पाहिजे, असे उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मराठा आंदोलक आणि पवारांच्या भूमिका वेगळ्या?
दरम्यान विविध समाज आणि प्रवर्गाचे आरक्षण वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आरक्षणची मर्यादा ५० टक्के वरून ७५ टक्के करण्याची मागणी केली आहे. त्यांची री ओढताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात अशीच मागणी करीत आरक्षण मर्यादा वाढविण्याची मागणी केली. याकडे लक्ष वेधले असता,फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवार (साहेब) मर्यादा वाढविण्याची मागणी करतात याचा च अर्थ , मराठा आंदोलक आणि शरद पवार यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत.यामुळे आरक्षणाच्या मागणिबाबत तुम्ही (प्रसिद्धी माध्यमांनी) शरद पवार यांनाच विचारणा केलेली बरी, असे सांगून चर्चेला विराम दिला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचे थेट नाव घेण्याचे टाळत मराठा आंदोलक असा उल्लेख केला, हे येथे उल्लेखनीय.
हे ही वाचा…ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…
खामगाव येथे स्वागत
यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी खामगाव येथील सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या (हेलीपॅडवर) हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रसाशनच्या वतीने त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले.यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील आदी उपस्थित होते.