बाबा अस्वस्थ झाले, पण डगमगले नाहीत. कारण एकच, भक्तांचा मिळणारा आंधळा पाठिंबा! या प्रकरणातून तावून सुलाखून निघालेल्या या बाबाचा प्रकटदिन नुकताच झाला. त्याला लाखोची गर्दी होती व ही गर्दी बघून तोंडाला पाणी सुटलेले नेतेही भरपूर होते. याच जिल्ह्य़ात अंजनगावसुर्जी परिसरात तर मठांचा बाजार भरवावा अशी स्थिती आहे. सधन, प्रगत व शिक्षित शेतकरी अशी ओळख असलेला हा परिसर गेल्या अनेक दशकांपासून मठांना शरण गेला आहे. काही जाणत्यांचा अपवाद सोडला तर सारे अनुयायांच्या भूमिकेत कायम दिसतात. येथील एका मठात उजव्या विचारसरणीच्या लोकांचा मोठा राबता आहे. एका सिनेनटाचे नाव धारण करणारा महाराज या मठाचा मठाधिपती आहे. ही गादी सांभाळण्याआधी तो उजव्या विचाराचा कट्टर कार्यकर्ता होता. नंतर गादीचा प्रश्न आला तेव्हा महाराज झाला. कार्यकर्ता ते महाराज असा प्रवास कसा काय सहज होऊ शकतो, हे वेदपुराणात पारंगत असलेल्या अनेकांना अजून कळले नाही. या महाराजाचे लाखो भक्त आहेत. या भक्तांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी उजव्या विचाराचे नेते त्यांना ठिकठिकाणी बोलवत असतात व चरणस्पर्श करून पापक्षालन करून घेत असतात. उपराजधानीत आर्थिक फसवणूक करून हजारो लोकांना लुबाडण्याच्या आरोपावरून सध्या तुरुंगाची हवा खात असलेले काही पांढरपेशे आरोपी या महाराजांचे भक्त आहेत. हे सारे पोलीस तपासातच आढळून आले. महाराजांवरील श्रद्धेपोटी अमरावती, अकोला भागातील अनेक भक्तांनी या पांढरपेशांच्या कंपनीत गुंतवणूक केली व आता हात चोळत बसले आहेत. एवढे सगळे घडूनही या फिल्मी नाव धारण केलेल्या महाराजाने या आरोपींविरुद्ध चकार शब्दही काढला नाही.
आम्ही प्रबोधन करतो, संतवाणी सांगतो असे उच्चरवात सांगणाऱ्या बाबांच्या शिकवणुकीत आर्थिक फसवणूक कशी काय बसते, या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनेकांना सापडलेले नाही. बुलढाणा जिल्ह्य़ात चिखलीजवळ भक्तांच्या निरस आयुष्यात चैतन्य फुलवणारा एक महाराज आहे. त्याच्या प्रकटदिनाला लाखो लोक जमतात आणि नेते सारा खर्च करतात. वाशीम जिल्ह्य़ात एका समाजाचे श्रद्धास्थान आहे. येथील महाराजांकडून अंधश्रद्धा पसरवली जात नाही हे खरे, पण तेथे जमा होणारा समाज आपल्या बाजूने यावा यासाठी या पहाडावर नेतेच लोटांगण घालत असतात. मठांच्या बाबतीत पूर्व विदर्भही मागे नाही. या भागातही अनेक लहान-मोठे बाबा गंडादोऱ्यांच्या माध्यमातून लोकांना व राजकारण्यांना भुलवत असतात. ब्रह्मपुरी, नागभीड परिसरात ‘करामत’ दाखवणाऱ्या एका बाबाचा मठ भलताच लोकप्रिय आहे. या मठात गेले की, ज्यांना मुले होत नाही त्यांना ती होतात म्हणे! सारासार विवेक गहाण टाकलेले लोक अशा ठिकाणी गर्दी करून असतात. या बाबाच्या उरुसाचा सारा खर्च स्थानिक राजकारणी करतात. याशिवाय बाहेरच्या दोन महाराजांनी वैदर्भीय राजकारणी व जनतेवर भारुड घातले आहे. त्यातला इंदोरचा महाराज तर नेत्यांमध्ये भलताच लोकप्रिय आहे. स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणारा हा महाराज नेत्यांना भविष्य सांगत असतो. विज्ञानाचा आणि भविष्याचा काय संबंध आहे, असा प्रश्न लोकांना कायम अक्कल शिकवणाऱ्या या नेत्यांना कधीच पडत नाही. यावरून अक्कल शिकवण्याची खरी गरज कुणाला आहे, हे सुद्धा अनेकांच्या ध्यानात येते, पण हे नेते इंदोरची वारी करण्यात मग्न असतात. उमेदवारी मिळणार का? निवडून येणार का असल्या प्रश्नांची उत्तरे हा महाराज कोडय़ात देतो. विदर्भात प्रभाव ठेवणारा दुसरा महाराज कोकणातला आहे. लाचखोर पटवारी ही त्याची खरी ओळख आहे. तोही हातात दंड घेऊन अप्रत्यक्षपणे धाक दाखवत विदर्भात मुक्तसंचार करत असतो. केवळ राजकारणी नेतेच नाही तर चांगले शिक्षित लोकही या महाराजांच्या नादी लागतात व कोटय़वधीची उधळण करत असतात. बाबा, महाराजांवर पैसा उधळण्यापेक्षा तो समाजातील वंचितांवर खर्च करावा, कायम डोके काढून बसलेल्या समस्या सोडवण्यासाठी वापरावा असे यापैकी एकालाही वाटत नाही. या साऱ्यांच्या अंगावर श्रद्धेची झूल एवढी घट्ट पांघरलेली असते की त्यांना वास्तवाचे भानच उरत नाही. समाजातील विषमता, गरीब व श्रीमंतामध्ये रुंदावत चाललेली दरी, त्यातून उद्भवणारे वाद, द्वेषाचे वातावरण, धार्मिक तेढ यातले काहीही या भक्तांना दिसत नाही. उलट बाबा व महाराजाच्या दरबारात सारेजण विषमता व द्वेष विसरून कसे एकत्र येतात, याची रसभरीत वर्णने करण्यात हे भक्त व्यस्त असतात व सामाजिक एकोपा कसा वाढतो, ते सांगत असतात. भक्तांनी घेतलेले भुलीचे इंजेक्शन व राजकारण्यांचे मतांसाठी डोळे मिटणे यातूनच हा बाबा, महाराजांचा धंदा विदर्भात फोफावला आहे. एखाद्या प्रदेशाची अशी ओळख होणे किती वाईट हे कुणाच्याही लक्षात येत नाही हे खरे दुर्दैव!
देवेंद्र गावंडे devendra.gawande @expressindia.com