अकोला : खासदार संजय राऊत दिशाभूल करणारे वक्तव्य सातत्याने करीत असून त्यांनी विवेकी होण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी ‘मविआ’चा घटक पक्ष आहे तर त्यांना आतापर्यंत झालेल्या चारही बैठकीचे निमंत्रण का देण्यात आले नाही? व जागा वाटपाच्या चर्चेतही वंचितला विश्वासात का घेतले जात नाही? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले.

अकोल्यात रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. खा. राऊत यांनी वंचित ‘मविआ’चा घटकपक्ष असून त्यांना प्रत्येक बैठकीत निमंत्रित केल्याचे वक्तव्य केले. त्यावर नाराजी व्यक्त करीत डॉ. पुंडकर म्हणाले,” आतापर्यंत ‘मविआ’च्या चार बैठकी झाल्या. त्यातील केवळ दोन बैठकांना त्यांनी वंचितला निमंत्रित केले. घटक पक्षाला चर्चेतून बाहेर का ठेवले जात आहे? तीन पक्षांनी एकत्र बैठक करून ३९ जागेवर एकमत केले. आम्हाला विश्वासात घेतले नाही. आम्हाला ज्या जागा हव्या आहेत, त्या संबंधित पक्षाशी चर्चा करून घेऊ, अशी भूमिका वंचितने घेतली. त्यावर असे जगात कुठे होत नसते, असे राऊत म्हणाले. घटकपक्ष असतांना चर्चेत न घेणे असेही जगात कुठे होत नसते. नरेंद्र मोदी आणि भाजपला रस्त्यावर उतरून सगळ्यात जास्त विरोध करणाऱ्या वंचितला जवळ न करणे, आघाडीतील घटक पक्षाच्या प्रतिनिधीला बैठकीतून चार तास बाहेर बसवणे, असेही कुठे होत नसते.”

हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी निर्माणाधीन मंडप कोसळला, चार जण जखमी

‘मविआ’ व इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी वंचित सुरुवातीपासूनच इच्छूक आहे. वारंवार तसे बोलून दाखवले आहे. मात्र, वंचित आघाडीला केवळ निमंत्रितच ठेवले आहे, असा आरोप डॉ. पुंडकर यांनी केला. वंचित घटकपक्ष असता तर आम्हाला चारही बैठकीत निमंत्रित करून जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी करून घेतले असते. मात्र, तसे होतांना दिसत नाही, असे देखील ते म्हणाले. २७ तारखेच्या बैठकीसाठी निमंत्रण दिल्याचे व वंचितने येण्याचे मान्य केले, असे खा. राऊत सांगतात, मात्र या क्षणापर्यंत वंचितचा निमंत्रण मिळालेले नाही. ते चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत, असा आरोप डॉ. पुंडकर यांनी केला. लोकांमध्ये संशय निर्माण होणाऱ्या भूमिका संजय राऊत यांनी घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.

“आघाडीतील नेतेच भाजपमध्ये”

भाजपाला पूरक होईल अशी भूमिका घेणार नाही, असे वक्तव्य खा. राऊत यांनी केले. ते आक्षेपार्ह विधान असल्याचे डॉ. पुंडकर म्हणाले. महाविकास आघाडीत यांच्याशी चर्चा सुरू होती, तेच अशोक चव्हाण भाजपमध्ये निघून गेले. तुमच्याच आघाडीतील नेते भाजपमध्ये जाऊन पडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही भाजपच्या विरोधातच आहोत, असे देखील ते म्हणाले.