नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनी भाविकांना अन्नवाटप करण्याची तयारी करताय? पदार्थांच्या खरेदीपासून शिल्लक अन्नाच्या विल्हेवाटीपर्यंत खबरदारी घेणे आयोजकांना बंधनकारक आहे. विषबाधा टाळण्याची जबाबदारीही त्यांचीच असेल. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूर शहर-जिल्ह्यातील संस्था, ट्रस्ट आणि आयोजकांसाठी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. मिठाई, पेढा, बर्फी, खवा, दूध-दुग्धजन्य पदार्थ आणि तयार अन्नाच्या वाटपासाठी कोणती काळजी घ्यावी?
अन्नवाटपासाठी परवाना आवश्यक आहे का?
अन्नसुरक्षा व मानदे कायदा, २००६ नुसार नियुक्त आहारसेवा पुरवठादाराकडे परवाना आवश्यक आहे. आयोजक स्वतः अन्न बनवत असल्यास परवाना किंवा नोंदणी बंधनकारक नाही; मात्र अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे सर्व निकष पाळावे लागतील. अन्नवाटप उपक्रमाची नोंद प्रशासनाच्या पोर्टलवर करावी.
कच्चा माल आणि फळे कोठून खरेदी करावीत?
परवानाधारक अथवा नोंदणीकृत व्यावसायिकांकडून कच्चा माल घ्यावा. मुदतबाह्य पदार्थ टाळावेत आणि खरेदीची बिले जपावीत. फळे परिसरातील परिचित परवानाधारक किंवा नोंदणीकृत विक्रेत्यांकडून घ्यावीत. कच्ची, सडलेली, खराब फळे वापरू नयेत. आवश्यक तेवढेच अन्न तयार करून ते सेवनास सुरक्षित असल्याची खात्री करावी.
स्वयंपाकस्थळ आणि स्वयंसेवकांसाठी नियम कोणते?
स्वयंपाकस्थळ स्वच्छ, नीटनेटके व आरोग्यदायी असावे. भांडी स्वच्छ आणि झाकणयुक्त असावीत. अन्न तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाणी वापरावे. स्वयंसेवकांना अॅप्रन, हातमोजे, टोपी द्यावी; त्यांनी प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवावेत. अन्न बनवणारे आणि वाटणारे त्वचारोग व संसर्गजन्य आजारांपासून मुक्त असावेत.
खवा-माव्याबाबत विशेष काळजी का आवश्यक?
खवा-मावा नाशवंत असल्याने विशेष खबरदारी घ्यावी. दूध-दुग्धजन्य पदार्थ चार अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात साठवावेत. खवा-माव्याची वाहतूक शीतवाहनातून करावी. जुना, शिळा अथवा अनेक दिवस शीतगृहात साठवलेला खवा-मावा वापरू नये.
शिल्लक अन्न आणि तपासणीबाबत जबाबदारी कोणाची?
शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावून विषबाधा टाळण्याची जबाबदारी संस्था, ट्रस्ट अथवा आयोजकांची आहे. तपासणीसाठी जबाबदार व्यक्ती नेमावी. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
संशयास्पद पदार्थांची तक्रार कोठे करावी?
बिले आणि पुराव्यांसह पॅलेस रोड, सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. उपक्रमाची नोंद व तक्रारी complaints.mahafda.in वर करता येतील. तक्रारींसाठी १८००२२२३६५ या विनामूल्य क्रमांकावर किंवा नागपूर कार्यालयात संपर्क साधावा, असे सहआयुक्त (अन्न) कृ. रं. जयपूरकर यांनी कळवले आहे. राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्तांच्या जनस्वास्थ्यविषयक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
