अकोला : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगेत दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी धारगडमध्ये यात्रा महोत्सव भरतो. निसर्ग सौंदर्य आणि भक्तीचा अनोखा संगम असलेला हा महोत्सव ३० व ३१ ऑगस्टला होत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रातील शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड येथे ‘हर हर बोला महादेव’ च्या गजरात हजारो भक्तगण दाखल होतात. विशेष म्हणजे वर्षभरात केवळ दोनच दिवस येथे प्रवेश मिळतो.

सातपुडाच्या पर्वत रांगेत वसलेले प्राचीन शिवालय 

श्री क्षेत्र धारगड येथे प्राचीन शिवालय असून, हे सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये वसले आहे. समुद्र सपाटीपासून तीन हजार फुट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी असलेल्या गुहामध्ये दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा व कसे निर्माण झाले, याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. या बाबत काही आख्यायिका आहेत. संपूर्ण वऱ्हाड हे दंडकारण्यात समाविष्ट होते. महाभारतकालिन राजकुमार एकलव्य यांच्या पित्याचा दंडकारण्यात अंमल होता. एकलव्य व त्यांचे पिता हे महादेवाचे निस्सीम भक्त होते. त्यांनीच स्थापना केली, अशी एक तर दुसरी आख्यायिका अशी की, नरनाळा किल्ल्याच्या सरदाराची पत्नी शिवभक्त होती. तीनेच सरदाराला शिवलिंग स्थापना करायला लावली, असेही बोलले जाते. मात्र, याबाबत कुठलाही पुरावा इतिहासात आढळून येत नाही. या गुहेच्या काही अंतरावरच एक लहान भुयार असून येथे एक शिवलिंग व नंदी आहे.

जिल्हा अमरावती, मात्र जाण्याचा मार्ग अकोटवरून

धारगड अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असले तरी धारगडला जाण्यासाठी सोईस्कर मार्ग हा अकोला जिल्ह्यातील अकोटवरून आहे. त्यामुळे धारगड यात्रेचे खरे महत्त्व हे अकोटलाच दिसून येते. श्री क्षेत्र धारगड हे अकोट वरून पाऊल वाटेने जवळपास २५ किमी अंतरावर येत असून प्रमुख मार्गाने ३७ किमी दूर येते. बहुतांश शिवभक्त हे पाऊल वाटेने जाण्यास पसंती देतात. पूर्णा नदीच्या जलानी भरलेली कावड खाद्यांवर घेऊन भक्तगण अकोटवरून पोपटखेड मार्गाने धारगड गाठतात. जलाभिषेक करून काही भक्त लहान महादेवावर जातात. 

इतर दिवशी असतो प्रतिबंध

यावर्षी सुद्धा हा यात्रा महोत्सव ३० व ३१ ऑगस्टला उत्साहात होत आहे. खटकाली तपासणी नाक्यापासून ३० ऑगस्टला सकाळी ८ वाजतापासून ते ३१ ऑगस्टपर्यंत ३ वाजेपर्यंत प्रवेश सुरू राहणार आहे. ३१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजेपर्यंत खटकाली नाका येथून भाविकांनी बाहेर निघणे बंधनकारक आहे. इतर दिवशी धारगड मंदिरात प्रवेश प्रतिबंधित आहे.

निसर्ग सौंदर्यात भक्तीचा महापूर

श्री क्षेत्र धारगड येथे निसर्ग निर्मित धबधबा भक्तांवर जणू जलाभिषेक करतो. निसर्गाने बांधलेली भक्तांची पूजा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखीच असते. भक्तीचा हा महापूर श्रावण महिन्यामध्ये पाहण्यासारखा असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण, नद्या-नल्यांमध्ये झुळझुळणारे पाणी, निसर्ग सौंदर्याने नटलेला मनमोहक सूर्या धबधबा व निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू यामुळे भक्तगणांना धारगडचे वेध लागतात.