गडचिरोली : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची चार वेळा संधी होती. परंतु शरद पवार यांनी त्यांची संधी हिरावून घेतली, असा आरोप राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोली दौऱ्यावर असून त्यांनी सिरोंचा येथे माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावे केले. अजित पवार यांच्या सन्मान यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांची प्रतिमा आधीपासूनच उंच आहे. या यात्रेमुळे ती अधिक उंच होईल. दहा अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव अर्थमंत्री आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा क्रांतिकारक आहे. मी गेल्या ४५-५० वर्षापासून शरद पवार यांच्यासोबत होतो. त्यांना मी जवळून बघितले आहे. अजितदादांना या काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी चार वेळा चालून आली होती. परंतु शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. मात्र, आता महायुतीची सत्ता आल्यास आमचे मुख्यमंत्री तेच असतील, असे आत्राम यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा…‘डिजिटल अटक’ सायबर गुन्हेगारांचे नवे शस्त्र, जाणून घ्या…

जागावाटपासंदर्भात ते म्हणाले की, आम्ही यावेळी विदर्भात २० आणि राज्यात ९० जागांची मागणी केली आहे. यातून सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील आमदारांना लक्ष्य करण्यासाठी रणनीती आखण्यात येत असली तरी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सक्षम आहोत, असेही आत्राम यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधकांच्या बैठका दिल्लीत,आम्ही मुंबईतच

एकेकाळी राज्याच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी दिल्लीतील नेते मुंबईत मातोश्रीवर येत होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांना चर्चेसाठी दिल्लीला जावे लागत आहे. तर आम्ही महायुतीतील सर्व घटक पक्ष मुंबईत बसूनच चर्चा करीत असतो. यावरून विरोधकांची अवस्था आपल्याला लक्षात येते. संविधान बदलाची अफवा पसरवून लोकसभेत त्यांनी काही जागा काबीज केल्या. परंतु आता जनतेला सर्व लक्षात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत विरोधकांना त्यांची जागा जनताच दाखवून देईल, असे आत्राम म्हणाले.

हेही वाचा…राज्यातील ५०० पोलीस उपनिरीक्षकांच्या खांद्यावर लागला ‘तिसरा स्टार’

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. अशातच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी, महायुतीची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री असतील, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आत्राम यांनी केलेल्या दाव्याचे राज्याच्या राजकारणात आता काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.