गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील, विशेषतः अहेरीच्या राजकारणाला मोठा वेग आला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांनी आज भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘घरवापसी’ केली. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ओल्लालवार यांच्या पक्षांतरामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ओल्लालवार हे तसे मूळचे राष्ट्रवादीचेच. २०१० ते २०१३ या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याआधी त्यांच्या पत्नीनेही जिल्हा परिषदेत महिला व बालविकास सभापती म्हणून काम पाहिले होते. मात्र, २०१३ नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षांतर्गत राजकारणामुळे अस्वस्थ व नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे ओल्लालवार यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी एक महत्त्वपूर्ण राजकीय भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धर्मरावबाबा यांनी आज आलापल्ली येथे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
या भेटीला एक जुना राजकीय संदर्भ आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दीपक आत्राम यांनी ‘जायंट किलर’ ठरत तत्कालीन प्रबळ नेते धर्मरावबाबा आत्राम यांचाच पराभव केला होता. हा पराभव धर्मरावबाबा यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला होता. आदिवासी विद्यार्थी संघातून राजकारणात आलेले दीपक आत्राम यांनी पुढे काँग्रेस आणि त्यानंतर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असा राजकीय प्रवास केला. सध्या ते कोणत्याही पक्षात अधिकृतपणे सक्रिय नाहीत.
अशा स्थितीत धर्मरावबाबांनी त्यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट नसून, त्यामागे खोल राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. ही भेट काँग्रेसमधील पक्षांतर्गत स्पर्धकांवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांना ‘चेकमेट’ देण्यासाठी आहे, की दीपक आत्राम यांनाच राष्ट्रवादीच्या गोटात खेचण्याची ही भविष्यातील मोठी खेळी आहे, यावरच आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
