बुलढाणा : ऐन मतदानाच्या तोंडावर हेतुपुरस्सर ‘व्हायरल’ करण्यात आलेली ‘ऑडिओ क्लिप’ म्हणजे माझ्या विरोधात आखण्यात आलेले सुनियोजित कटकारस्थान आहे, असा पलटवार अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी केला. समाज माध्यमावर शनिवारी सार्वत्रिक झालेल्या ध्वनिफीत मधील आवाज माझा नसून त्यातील व्यक्तीला मी ओळखत देखील नसल्याचा दावाही त्यांनी केला.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी येथील आपल्या निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना काँग्रेस नेते धीरज लिंगाडे यांनी या ध्वनिफीत प्रकरणी मतप्रदर्शन केले. ते म्हणाले की, हे ‘ऑडिओ’ प्रकरण विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात विद्यमान आमदार रणजित पाटील यांच्याबद्दल मतदारात प्रचंड रोष आहे. याउलट महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला उत्साही प्रतिसाद मिळत आहे.
लोकांनी परिवर्तनाचा निर्धार केल्याचे चित्र आहे. यामुळे विरोधक घाबरले असल्याने त्यांना बोलण्यासारखे काहीच नसल्याने रडीचा डाव खेळत माझ्या बदनामीचा कट रचला. मी मूळचा काँग्रेसचा आहे. सन १९९५ च्या बुलढाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर शिवसेनेत जिल्हाप्रमुख म्हणून उत्तम कामगिरी बजावली. ज्या काँग्रेसने मला विधानपरिषदेची उमेदवारी दिली त्या पक्षाविरुद्ध मी कसा आणि का बोलणार, असा सवाल लिंगाडे यांनी उपस्थित केला. मतदारांना यामागील उद्देश माहीत असून ते यंदा परिवर्तन घडवून आणतीलच, असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला.