Dhirendra Krishna Shastri vs Shyam Manav : नागपूर: आपल्या चमत्कारिक दाव्यांमुळे चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या नागपुरात असून, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारत त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘मी सध्या नागपुरातच आहे. येथे रामकथा सुरू आहे. जर कोणाला काही खाज(शंका) असेल, तर त्यांनी खुशाल समोर यावे’, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

सोशल मीडियावर सध्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा ‘अंनिस’ला आव्हान देणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत टीकाकारांना प्रतिआव्हान दिले आहे.

आमचीही झंझट कायमची संपेल

रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ‘अंनिस’चे श्याम मानव यांनी शास्त्रींना त्यांचे चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही मानव यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता जाहीर भूमिका मांडली आहे.

शास्त्री यांनी स्पष्ट केले की, ‘ज्यांना शंका आहे, त्यांनी तिथे येऊन खात्री करावी. मी कोणी जादूगार नाही. माझ्याकडे जी विद्या आणि शक्ती आहे, त्याचे मी सादरीकरण करेन. ईश्वर मला जी प्रेरणा देतो, त्यातूनच मी लोकांना माहिती देतो. मी ३० तारखेला इथून निघून जाणार आहे. त्यानंतर मी पळून गेलो, असा आरोप करू नका. जे काही करायचे आहे ते आत्ताच करा, म्हणजे तुमची आणि आमचीही झंझट कायमची संपेल.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या आव्हानानंतर आता श्याम मानव किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धीरेंद्र शास्त्रीवर महाराष्ट्रात बंदी घाला!

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेड आणि इतर सामाजिक संस्थांद्वारे सभा घेण्यात आली. यामध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर महाराष्ट्रबंदी घालण्यात यावी. तसेच गुन्हा दाखल करून अटक व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड, सामाजिक कार्यक्रर्ते नरेंद्र जिचकार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रताप पटले आदींची उपस्थिती होती.