नागपूर : आपण चार मुले जन्माला घातल्यास त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे, असे प्रतिपादन बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख (पीठाधीश्वर) धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी केले. या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नागपुरातील जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल परिसरात शुक्रवारी भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, अवधेशानंद गिरी, गोविंद गिरी, मित्रानंद, साध्वी ऋतंभरा, शैलेश जोगळेकर, ॲड. सुनील मनोहर आदी उपस्थित होते.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, देशात कुठेही नैसर्गिक किंवा अन्य आपत्ती उद्भवली की अनेक जण जीव वाचवण्यासाठी पळ काढतात; मात्र संघाचे स्वयंसेवक प्रतिकूल परिस्थितीतही पुढे येऊन लोकांचे प्राण वाचवण्याचे कार्य करतात. त्यामुळे आपण चार मुले जन्माला घालत असाल, तर त्यापैकी एक मूल संघाला द्यावे. ही मुले समाजकल्याणाच्या कार्यात उपयोगी पडतील. भारतदुर्गा मंदिर लोकांचा गौरव वाढवेल आणि त्यातून अखंड भारताची संकल्पना बळकट होईल, असेही शास्त्री यांनी नमूद केले.

…तर अखंड भारत बनेल – धीरेंद्र शास्त्री

भारत मातृप्रधान देश आहे. जेव्हा भारतदुर्गा मंदिर बनेल तेव्हा देश शक्तीसंपन्न होईल व अखंड भारत बनेल. पाकिस्तान माता किंवा चीन मातेचा जय असे कधी ऐकले नाही. संपूर्ण जगात फक्त भारतातच मातेचा जयजयकार होतो. जगात महिलांना भोग्य मनले जाते, मात्र भारतात महिलांना पूज्य मानले जाते. भारत देवशक्ती व पुजेकडे परत जात आहे. हे मंदीर पाहून जगातील लोकांना कळेल की भारत शास्त्र व शस्त्रांच्या आधारे चालतो, असेदेखील धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

‘पाकिस्तान माता’, ‘चीन माता’ असा जयघोष कुठे ऐकू येतो का?

जगातील कोणत्याही देशात त्या देशाच्या नावासोबत ‘माता’ जोडून जयघोष केला जात नाही. ‘पाकिस्तान माता’, ‘चीन माता’ किंवा ‘बांगलादेश माता’ असा जयघोष कुठेही ऐकू येत नाही; मात्र ‘भारत माता की जय’ हा घोष जगभर परिचित आहे. यावरून भारतात मातृत्वाला दिलेले स्थान स्पष्ट होते. आपल्या संस्कृतीत ‘सीता-राम’ असा उल्लेख केला जातो, म्हणजेच रामाच्या आधी सीतेचे नाव घेतले जाते. भारत नव्या इतिहासाची निर्मिती करेल. लोक पुन्हा पूजाअर्चेकडे वळत आहे, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.